झारखंडमध्ये महाआघाडीत तीव्र मतभेद, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबतच्या बैठकीकडे काँग्रेसची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 03:32 PM2021-12-17T15:32:54+5:302021-12-17T15:33:33+5:30
Congress News: झारखंडचे मुख्यमंत्री Hemant Soren यांच्या अध्यक्षतेखाली महाआघाडीच्या घटक पक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीकडे सत्ताधारी महाआघाडीमधील घटकपक्ष असलेल्या Congress ने पाठ फिरवली.
रांची - झारखंडच्या राजकारणामध्ये सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महाआघाडीमधील घटकपक्षांमध्ये सध्या सारे काही आलबेल राहिलेले नाही. दरम्यान, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली महाआघाडीच्या घटक पक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीकडे सत्ताधारी महाआघाडीमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने पाठ फिरवली. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तसेच आधी थंडीने गारठलेल्या झारखंडमध्ये राजकीय पारा चढला आहे. सध्या काँग्रेस अनेक मुद्द्यांवरून हेमंत सोरेन यांच्यावर नाराज आहेत.
गुरुवारी एकीकडे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीमधील घटक पक्षांच्या आमदारांची बैठक झाली. तर दुसरीकडे हेमंत सोरेन सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी वेगळी बैठक घेतली. महाआघाडीमधील पक्षांच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवसास्थानी झाली होती. तर काँग्रेस आमदार संसदीय मंडळाचे नेते आलमगीर आलम यांच्या निवासस्थानी जमले होते.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दल आमदारांची बैठक झाली होती. महाआघाडीच्या घटक पक्षांची बैठक वेगवेगळ्या मुद्द्यांवर झाली. यामध्ये विशेष चर्चा ही विधानसभा अधिवेशनादरम्यान, विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी विशेष रणनीतीवर चर्चा झाली.
झारखंडमधील काँग्रेस पक्ष हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर नाराज आहे. सरकारमध्ये आपले ऐकले जात नाही, असा काँग्रेसचा आरोप आहे. तसेच तसेच काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना महत्त्व दिले जात नाही, असा आक्षेपही काँग्रेसकडून घेतला गेला आहे. आता काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकारणातील वातावरण तापले आहे.