बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी बडे राजकीय नेते येणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती व समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव संपूर्ण राज्यात दौरे करून आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाजुने मतदारांना वळवण्याचा प्रयत्न करतील.निवडणूक आयोगाने काँग्रेस व भाजपाचे कोण स्टार प्रचारक येणार आहेत, याची यादीच जाहीर केली आहे. काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची नावे आहेत, तर भाजपाच्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह आदींची नावे आहेत.आदित्यनाथ हे ३५ मेळावे आणि रोड शोजमध्ये भाग घेतील. आदित्यनाथ हे नाथ संप्रदायाचे असून कर्नाटकात किनारी भागात या संप्रदायाचे अनुयायी लक्षणीय संख्येत आहेत. तीन मेपासून आदित्यनाथांचा दौरा सुरू होईल. ७ ते दहा मे दरम्यान ते रोज मेळावे घेतील, असे भाजपचे प्रवक्ते शलभ मणी त्रिपाठी यांनी लखनौत सांगितले.समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव समाजवादी पक्ष ज्या मतदारसंघांत निवडणूक लढवत आहे तेथे प्रचार करतील. कर्नाटकात सपाने दोन डझनपेक्षा जास्त उमेदवार उभे केले आहेत, असे पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. बसपच्या नेत्या मायावती यांच्या पक्षाने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दलाशी (धर्मनिरपेक्ष) युती केली असून म्हैसूरमध्ये बुधवारपासून त्यांच्या मेळाव्यांना सुरुवातही झाली. मायावती पाच व सहा मे रोजी अनुक्रमे बेळगाव व बिदरला मेळावा घेणार आहेत. बसपने राज्यात २० उमेदवार जनता दलाच्या पाठिंब्यावर उभे केले आहेत.मोदींचा नेत्यांशी संवादकाँग्रेस कर्नाटकात जातीच्या आधारे समाजात फूट पाडत असून खोटा व चुकीचा प्रचार करीत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी केला. भाजपचा राज्याचा विकास हाच एकमेव कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकचा विकास, जलदगतीने विकास आणि सर्वांगीण विकास हा भाजपचा कार्यक्रम आहे, असे मोदी मोबाईल अॅपच्या माध्यमातून पक्षाचे नेते, पदाधिकारी, उमेदवार यांच्याशी संपर्क साधताना म्हणाले. काँग्रेसची सत्ता आता बदलून टाकण्याचा निर्धार मतदारांनी केला असल्याचा दावा मोदी यांनी केला. कर्नाटकचे भाग्य बदलण्यासाठी पूर्ण बहुमताचे सरकार आवश्यक आहे. आज जगात भारत चमकतोय कारण ३० वर्षांनंतर केंद्रात आमचे पूर्ण बहुमताचे सरकार आले आहे, असे मोदी म्हणाले.
काँग्रेस-भाजपाचे ४0 स्टार नेते प्रचाराला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:35 AM