नवी दिल्ली- तुमच्याकडे किती जात आहे, याची मला कल्पना नाही. पण आमच्या पाच जिल्ह्यांतून जात हद्दपार झाली आहे. मी सर्वांना सांगूनच ठेवलंय की, जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन, असं नितीन गडकरी म्हणाले होते. तोच धागा पकडून काँग्रेसनं त्यांच्यावर पलटवार केला आहे. मग हनुमानाची जात सांगणाऱ्यांना तुम्ही मारणार का?, असा प्रश्न काँग्रेसनंनितीन गडकरींना विचारला आहे. मध्य प्रदेशमधल्या काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून असं ट्विट करण्यात आलं आहे. नितीन गडकरींच्या जातीचा उल्लेख केलेल्या विधानाचा हवाला देत काँग्रेसनं भाजपावर टीका केली आहे. तसेच नितीन गडकरींचं ते विधान भाजपा नेत्यांसाठीच असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी म्हणाले होते की, मी जात-पात मानत नसून आर्थिक, सामाजिक-समतेच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे.गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी पुनरुत्थान समरसता, गुरूकुलमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जातीबद्दल आपले मत मांडले होते. जातीयवाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता-एकता या आधारावर संपूर्ण समाजाच संघटन झालं पाहिजे होतं. गरीब-श्रीमंत ही दुफळी संपायला हवी. कोणीही छोट्या किंवा मोठ्या जातीचा असता कामा नये, एकात्मता आणि पूर्ण अखंड समाज असायला हवा हीच संकल्पना असल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलं होतं.
गडकरींच्या विधानावर काँग्रेसचा पलटवार, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी बदडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 10:15 PM