रायबरेली : राफेल खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यावर एकीकडे काँग्रेस प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायबरेलीतच काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालयावरही आता काँग्रेसचा विश्वास राहिलेला नसल्याचा आरोप मोदी यांनी केला. मोदी येथे रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनावेळी बोलत होते.
देशासमोर दोन शक्ती आहेत. एक देश कसा संरक्षण क्षेत्रात ताकदवान होईल आणि दुसरी ताकद देश कसा खच्चीकरण होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. देश पाहतोय की काँग्रेस देशाला कमजोर करणाऱ्या शक्तीबरोबर उभा आहे जी शक्ती संरक्षण दलांना ताकदवान झालेले पाहत नाही, असे सांगताना मोदी यांनी रामचरित्रमानस या ग्रंथाचा आधार घेत काही लोक खोट्याचाच स्वीकार करतात, खोटेच सांगत फिरतात, खोटेच खातात आणि चावतात, असा टोलाही लगावला.
या लोकांसाठी संरक्षण मंत्रालयही खोटे वाटतेय, देशाचे संरक्षण मंत्रीही खोटे वाटतात, हवाईदलाचे अधिकारीही खोटेच वाटतात आणि आता तर सर्वोच्च न्यायालयही खोटे वाटू लागले आहे. खोटे कितीही बोलले गेले तरीही त्यामध्ये आत्मा असत नाही. खोटेपणावर नेहमी सत्याचाच विजय होतो, असेही मोदी यांनी सांगितले.
कारगिल युद्धानंतर आपल्या हवाईदलाला अत्याधुनिक विमानांची गजर भासू लागली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनंतर काँग्रेसने 10 वर्षे सत्ता उपभोगली. मात्र, हवाईदलाची ताकद वाढविली नाही. कशासाठी, कोणाच्या दबावाखाली, असा प्रश्नही मोदी यांनी उपस्थित केला.
दरम्यान, काँग्रेसनेही मोदी यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना सांगितले की, जो व्यक्ती सर्वोच्च न्यायालयातही खोटे बोलू शकतो, त्याच्याकडून सत्याची अपेक्षा कशी करता येईल. सरकारने खोटे सांगतिल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निर्णय त्वरित मागे घ्यायला हवा. तसेच सरकारला न्यायालयाचा अवमान केल्य़ाप्रकरणी नोटीस पाठवायला हवी, असे काँग्रेसचे प्रवक्ता शर्मा यांनी सांगितले.