Congress Alliance Committee: विरोधकाच्या INDIA आघाडीची आज चौथी बैठक राजधानी दिल्लीत होत आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसने एक समिती स्थापन केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 'राष्ट्रीय आघाडी समिती' स्थापन केली आहे. या समितीत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह सलमान खुर्शीद, मोहन प्रकाश आणि मुकुल वासनिक यांना समितीचे समन्वयक करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही राज्यात काँग्रेसचे सरकार होते, तरीदेखील पक्षाने अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल यांच्यावर विश्वास टाकून त्यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पराभवानंतर गेहलोत आणि बघेल यांना राष्ट्रीय स्तरावर महत्वाची भूमिका देण्यात आली आहे.
दिल्लीत विरोधकांची बैठकआज (मंगळवार, 19 डिसेंबर) विरोधी इंडिया आघाडी बैठक दिल्लीत होत आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. यूपी, पंजाब, दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगालमधील जागांचे वाटप हे विरोधकांसमोरचे मोठे आव्हान असेल. अशा स्थितीत काँग्रेसने स्थापन केलेल्या समितीवर मोठी जबाबदारी असणार आहे. या बैठकीत जागावाटपाव्यतिरिक्त रणनीती आणि संयुक्त जाहीर सभा यावर चर्चा होऊ शकते. या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन, शरद पवार, लालू यादव, तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.