शीलेश शर्मा
नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस नवीन अध्यक्षांची निवड करणार आहे. नवीन अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती असेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. अध्यक्षपदाची धुरा प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्यात यावी, अशी आग्रही मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि शशी थरूर यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती; तथापि, प्रियांका गांधी यांनी नकार दिला आहे.
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष म्हणून अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेसच्या युवा नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. त्यावर पक्ष नेतृत्व निर्णय घेणार आहे. तथापि, या निर्णय प्रक्रियेपासून राहुल गांधी यांनी अलिप्त राहण्याचे ठरविले आहे; परंतु सूत्रांनुसार सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच नवीन अध्यक्षांचा निर्णय होईल.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती, तसेच गांधी घराण्यातील कोणताही सदस्य अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.उद्या पक्ष सरचिटणीसांची बैठककाँग्रेसने ३१ जुलै रोजी पक्ष सरचिटणीसांची बैठक बोलावली असून, या बैठकीत राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीशी संबंधित कार्यक्रमांच्या तयारीबाबत चर्चा केली जाणार आहे. २० आॅगस्ट रोजी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करून पंतप्रधान म्हणून त्यांनी राष्टÑाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती युवा पिढीला दिली जाणार आहे. मुख्य कार्यक्रम दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित केला जाण्याचे संकेत आहेत.