नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, पहिल्यांदाच देशात प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा हे सरकार सत्तेत आलं आहे. लोकांनी जो विश्वास दाखविला त्यांचे मी आभार मानतो.
देश हरला म्हणणं लोकशाहीचा अपमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, राज्यसभेत चर्चेदरम्यान 50 सदस्यांनी सहभाग घेतला. काहींनी सूचना केल्या, काहींनी आक्रोश दाखविला. प्रत्येकाने आपली मते मांडली. जे लोक निवडणुकीच्या मैदानात उतरले नाही अशांनी या सभागृहात राग व्यक्त केला. खूप वर्षानंतर देशात बहुमताने सरकार आलं आहे. जगात सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. निवडणुकीला एक वेगळं महत्व असतं. या निवडणुकीत पराभव झाला म्हणून देश निवडणूक हरला असं म्हणणं म्हणजे लोकशाही आणि जनतेचा अपमान आहे.
वायनाडमध्ये भारत हरला का?विरोधक आरोप करतात की देश हरला आहे. लोकशाही हरली आहे. मग वायनाड आणि रायबरेली देश हरला का? अमेठीमध्ये भारत हरला का? काँग्रेसचा पराभव झाला म्हणजे देश हरला हा कोणता तर्क आहे. काँग्रेस म्हणजे देश नाही. अहंकाराची एक मर्यादा असते. 60 वर्ष देशात सरकार चालविणारा पक्ष 17 राज्यात एकही जागा जिंकू शकत नाही ते सहज बोलतात देश हरला. अशा विधानांमुळे देशातील मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले आहे. मतदारांचा अपमान होणं हे त्रासदायक आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकरी 2-2 हजारात मते विकतात असा आरोप करणं क्लेशदायक आहे.
निवडणुकीमुळे देशाची प्रतिष्ठा वाढलीमिडीयामुळे आम्ही निवडणुका जिंकलो. मिडीया विकाऊ आहे असे आरोप केले गेले. ज्या राज्यात आमचं सरकार नाही तिथेही हे लागू होणार का? तामिळनाडू आणि केरळमध्ये हे लागू होणार का? भारताची निवडणूक प्रक्रिया ही जगात देशाची प्रतिष्ठा वाढविण्याची संधी असते, ही संधी आपल्याला गमवावी लागू नये. 10 लाख मतदान केंद्र, 40 लाख ईव्हीएम, 8 हजारपेक्षा जास्त उमेदवार, 650 राजकीय पक्ष या रुपात निवडणूक प्रक्रिया व्यापक असते. जगासाठी हे सर्व आश्चर्यचकीत करणारे आहे हे आपल्यासाठी गर्वाचं आहे. निवडणुकीत महिलांची भागीदारी वाढली. पुरुषांसोबत महिलाही मतदानासाठी बाहेर पडल्या. 78 महिला खासदार यंदाच्या निवडणुकीत निवडून आल्या आहेत.
पराभवाचं खापर ईव्हीएमवर निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ईव्हीएमवर खूप चर्चा झाली. अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. जेव्हा आमचे सभागृहात फक्त 2 सदस्य निवडून आले होते तेव्हा आमची खिल्ली उडवली गेली. मात्र कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आम्ही पक्ष पुन्हा उभा केला. आम्ही कधी ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडलं नाही. कधी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. ज्यांना स्वत:वर विश्वास असतो ते बहाणे शोधत नाही. चूक स्वीकारण्याची ज्याची तयारी नाही ते ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडतात. जर हिंमत असेल तर राजकीय कॅडर तयार करा. एक निवडणूक झाली पुढे अनेक निवडणुका आहेत.
ईव्हीएम काँग्रेसनेच आणलं आज मतदान झाल्यानंतर देशात मतदान किती टक्के वाढलं याची चर्चा होते. मात्र पूर्वी हिंसा आणि मतदान केंद्र बळकावणं याची चर्चा होत होती. जेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही प्रक्रिया सुरु झाली तेव्हापासून देशात अशा लोकांचा पराभव झाला. देशाच्या लोकशाहीवर दबाव आणण्याचा काम केलं जातं. 1977 मध्ये पहिल्यांदा ईव्हीएमबाबत चर्चा झाली तेव्हा आम्ही राजकारणात कुठेही नव्हतो. 1988 मध्ये या सभागृहात बसलेल्या सदस्यांनी या व्यवस्थेला मंजूरी दिली. तेव्हाही आम्ही सभागृहात नव्हतो. ईव्हीएम काँग्रेसनेच आणलं आणि हारल्यानंतर त्याला दोष देत आहेत. ईव्हीएममुळे आतापर्यंत 113 विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आज त्याच ईव्हीएममुळे आम्हाला सत्तेत येण्याची संधी मिळाली. चार लोकसभा निवडणुकाही याच ईव्हीएममुळे तुम्ही जिंकला होता. ईव्हीएमवर संशय घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने थेट आव्हान दिलं होतं. मात्र एकाही पक्षाने ते आव्हान स्वीकारलं नाही.