नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस व जनता दल आघाडीच्या सरकारमध्ये सारे काही आलबेल नाही, असे दिसू लागताच, या दोन पक्षांच्या नाराज आमदारांना आपल्याकडे आणा, अशा सूचना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केल्या आहेत.बी. एस. येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेची एप्रिलमध्ये संधी मिळाली, पण बहुमत सिद्ध करण्याआधीच त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपविला. तरीही पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची त्यांची खुमखुमी कायम असल्याजे दिसत आहे. निवडणुकांनंतर पहिल्यांदाच भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक बंगळुरूमध्ये झाली. त्यात पराभवाच्या विश्लेषणाऐवजी काँग्रेस व जनता दलाच्या असंतुष्ट आमदारांना भाजपामध्ये आणावे, असा सल्ला त्यांनी दिला.येडियुराप्पा म्हणाले की, सध्याचे सरकार वर्षभरही टिकू शकणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी पुन्हा सरकार स्थापनेसाठी तयार राहायला हवे. दोन्ही पक्षांच्या नाराज आमदारांना भेटा, प्रसंगी त्यांच्या घरी जा, त्यांना आपल्या पक्षात आणा. जनतेचा कौल आपल्यालाच होता व आहे. राज्यात भाजपाचीच सत्ता यावी, असे जनतेला वाटत आहे. २0१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पुन्हा केंद्रात सरकार आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागायला हवे.घडामोडींचा महिनाकुमारस्वामी सरकार कोणत्याही स्थितीत पाच वर्षे टिकणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय होते ते आपण पाहू, त्यानंतर पुढची दिशा ठरवू, असे सांगून येडियुरप्पा यांनी ६ जुलैनंतर राज्यात बऱ्याच घडामोडी होतील, असे संकेत दिले. कुमारस्वामी ५ जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहेत. अधिवेशन २ जुलैपासून सुरू होत आहे.
काँग्रेस-जनता दलाच्या नाराजांना भाजपात आणा- येडियुरप्पा; लवकरच पुन्हा आपले सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:02 AM