कपिल सिब्बल भाजपा अन् संघाची भाषा बोलताहेत, काँग्रेस नेत्यांची परखड टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:23 AM2022-03-16T07:23:29+5:302022-03-16T07:24:46+5:30
सिब्बल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलत आहेत, असा आरोप या नेत्यांनी केला आहे.
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेेते कपिल सिब्बल यांंनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्ष नेतृत्वाविरुद्ध केलेल्या टिप्पणीवरून लोकसभेतील काँग्रेसच्या प्रतोदासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कपिल सिब्बल यांच्यावर परखड टीका केली. सिब्बल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलत आहेत, असा आरोप या नेत्यांनी केला आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे प्रतोद मणिकम टागोर यांनी म्हटले की, गांधी परिवाराने नेतृत्व सोडावे, असे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला का वाटते? कारण काँग्रेस पक्ष आणि भारतीय विचार संपविता येतील. हे कपिल सिब्बल जाणून आहेत; परंतु ते भाजप आणि संघाची भाषा का बोलत आहेत?
पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास स्वतंत्र....
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी सिब्बल यांनी ट्विटरवर म्हटले की, नेतृत्वाविरुद्ध ऊठसूट जाहीर बोलण्याऐवजी सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवायला पाहिजे. डॉ. हर्षवर्धन यांनी तुम्हाला चांदणी चौकातून माघार घेण्यास सांगितले नव्हते. त्यांनी निवडणूक लढवून तुम्हाला पराभूत केले. रोज नेतृत्वाविरुद्ध बोलण्याएवेजी ज्यांना पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे, ते पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास स्वतंत्र आहेत.
घर की नव्हे, सब की काँग्रेस हवी....
गांधी परिवाराने नेतृत्वापासून दूर होऊन अन्य नेत्याला पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे. मला ‘सब की काँग्रेस’ हवी आहे. काहींना मात्र ‘घर की काँग्रेस’ हवी, अशी टिप्पणी सिब्बल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केली होती.
रविवारच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत त्यांनीच अध्यक्षपदी राहून पक्ष बळकट करण्यासाठी पावले उचलावीत, असा निर्णय घेण्यात आला होता.