"लढाई काँग्रेसविरुद्ध नाही, कोरोनाविरोधात आहे; हे मोदी सरकारने समजून घ्यावं", राहुल गांधींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 03:09 PM2021-04-27T15:09:01+5:302021-04-27T15:14:26+5:30
rahul gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सध्याची लढाई कोरोनाविरोधात आहे, कोणत्याही राजकीय पक्षांविरोधात नाही, असे म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. असे असले तरी कोरोनावरून देशातील राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोरोनाच्या मुद्यांवरून एकमेकांवर टीका होताना दिसत आहे. यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सध्याची लढाई कोरोनाविरोधात आहे, कोणत्याही राजकीय पक्षांविरोधात नाही, असे म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (congress leader rahul gandhi attacks modi government on corona virus issues sonia gandhi)
यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. "मोदी सरकारने हे समजून घेतले पाहिजे की, लढाई करोनाविरोधात आहे, काँग्रेस किंवा इतर राजकीय विरोधकांविरुद्ध नाही," असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, याआधीही राहुल गांधी यांनी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. "रोजगार आणि विकासाप्रमाणे केंद्र सरकार कोरोनाची खरी आकडेवारी जनतेपर्यंत पोहचू देत नाही. महामारी नाही तर महामारीचे सत्य तर नियंत्रणात केलच आहे", असे ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 'दी इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या विशेष मुलाखतीद्वारे केली आहे. सोनिया गांधी यांनी कोरोनाविरोधातील लढाई ही 'आम्ही विरुद्ध तुम्ही' अशी नाही, तर ती आपण विरुद्ध कोरोना अशी आहे. ही लढाई देशाने एकजुटीने लढायची आहे, त्यासाठी राजकीय मतैक्य गरजेचे आहे, असे मत व्यक्त केलं आहे. त्याच अनुषंगाने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.
रोज़गार और विकास की तरह केंद्र सरकार कोरोना का असली डेटा भी जनता तक नहीं पहुँचने दे रही।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2021
महामारी ना सही, महामारी का सच तो नियंत्रण में कर ही लिया!
येत्या १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. यादरम्यान लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे. या लसींच्या किमती वेगवेगळ्या जाहीर केल्या आहेत. यावरूनही राजकारण तापले आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या लस धोरणावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. यामध्ये लसींच्या वेगवेगळ्या किंमतीबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, असे म्हटले होते.
('केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील', सोनिया गांधींची टीका )
कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय...
भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ नवे रुग्ण तर २७७१ मृत्यूंची नोंद झाली. दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ३२ हजार ५५५ ने वाढले आहे. दिवसभरात २,५१,८२७ रुग्ण बरे झाले आहेत.
(CoronaVirus : 'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता)