काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान, कारच्या छतावर बसून एका कुत्र्याला बिस्किट देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, कुत्रा बिस्कीट खात नाही, तेव्हा राहुल गांधी तेथेच उभ्या असलेल्या एका कार्यकर्त्याला ते बिस्किट देतात, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओवरून भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. आता यासंदर्भात राहुल गांधी यांना विचारले असता त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी एका पत्रकार परिषदेत म्हणाले, "यात एवढं मोठं काय? जेव्हा त्या कुत्र्याला माझ्याकडे आणले तेव्हा तो पूर्णपणे भांबावलेला होता. तो थरथरत होता. मी त्याला बिस्कीट खायला दिले, त्याने खाल्ले नाही. म्हणून मी ते बिस्कीट त्या व्यक्तीला दिले. आणि भाऊ तुम्हीच खाऊ घाला असे म्हणालो. यानंतर, कुत्र्याने ते बिस्किट खाल्ले. यावर भाजपच्या लोकांना काय ऑब्जेक्शन आहे? कुत्र्यांनी त्यांचे काय बिघडवले आहे."
पल्लवी नावाच्या एका महिलेनेही सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ शअर केला आहे. यात त्यांनी हिमंता बिस्वा सरमा यांना टॅग करत, "हिमंता यांच्यानंतर, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या आणखी एका सपोर्टरला डॉगीच्या प्लेटमधील बिस्किट दिले," असे लिहिले. याला उत्तर देत आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे, "पल्लवी जी, राहुल गांधीच नाही, तर संपूर्ण कुटुंबही मला ते बिस्किट खाऊ घालू शकलं नही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी बिस्किट खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामा दिला."
काय होतं संपूर्ण प्रकरण - भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, 'काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे जी यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यासोबत केली होती आणि इकडे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात एका कुत्र्याला बिस्किट देत आहेत. मात्र कुत्र्याने ते बिस्किट खाल्ले नाही, यानंतर त्यांनी तेच बिस्किट त्यांच्या एका कार्यकर्त्याला दिली.'
एवढेच नाही तर, "ज्या पक्षाचा अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांसोबत कुत्र्यासारखा व्यवहार करत असतील तर, असा पक्ष लुप्त होणे स्वाभाविक आहे."