नवी दिल्ली : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आणीबाणी (Emergency) घोषित करण्याला अनेक वर्षे उलटून गेली, तरी आजही त्यावर अनेक जण बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, इंदिरा गांधींचे नातू, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणीबाणी संदर्भात मोठे विधान केले आहे. कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचे मत व्यक्त केले. (congress leader rahul gandhi says emergency was mistake of indira gandhi)
प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत म्हटले की, आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षाने स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला.
उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा
भाजप सरकारने लोकशाहीचे नुकसान केले
प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशातील वर्तमान सरकार लोकशाही प्रणालीचे मोठे नुकसान करत आहे. भारतातील संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे, असा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत आहे. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस लोकशाहीसाठी झटत आली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मीडिया आणि न्यायालयावरही वचक ठेवण्याचा प्रयत्न
वर्तमान सरकारकडून प्रसारमाध्यमांपासून न्यायप्रणालीपर्यंत वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. मणिपूरचे राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुदुच्चेरीच्या उपराज्यपालांनीही अनेक विधेयक मंजूर होऊ दिली नाही, असा दावाही राहुल गांधींनी केला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, माझे वडील राजीव गांधी यांची हत्या आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी होती. ते अनेक शक्तींशी न घाबरता लढले, असे राहुल गांधी म्हणाले.