नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जम्मू-काश्मीरमधील मिश्र संस्कृती नष्ट केल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही संघटना लोकांमधील प्रेम आणि बंधुत्व नष्ट करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकतेच माता वैष्णो देवीचे दर्शन घेऊन परतलेल्या राहुल गांधींनी भाजप आणि संघावर निशाणा साधला आणि देवी लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वती यांची शक्ती कमी झाली आहे, असेही म्हटले आहे. (congress leader Rahul gandhi says modi gov policy decreased the power of goddess laxmi durga and saraswati)
राहुल गांधी यांनी, गुलाम नबी आझाद यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जम्मूच्या त्रिकुटा नगर येथे कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, "तुम्हा लोकांमधील प्रेम आणि बंधुभाव भाजप आणि आरएसएसकडून संपवला जात आहे. त्यांना जम्मू -काश्मीरमधील सर्वसमावेशक संस्कृती नष्ट करायची आहे. तुम्हाला कमकुवत करायची त्यांची इच्छा आहे. आपण स्वतःच पाहू शकता, की केंद्र शासित प्रदेशातील अर्थव्यवस्था, पर्यटन आणि व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे.''
"राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू'"; भाजपाची बोचरी टीका
राहुल गांधी म्हणाले, देवी दुर्गा रक्षण करणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे, देवी लक्ष्मी एखादे ध्येय साध्य करण्यासाठीच्या शक्तीचे प्रतीक आहे, तर देवी सरस्वती ज्ञानाची शक्ती आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या, नोटाबंदी आणि जीएसटीच्या धोरणाने देशातील देवी लक्ष्मीची शक्ती कमी केली आहे. याशिवाय, नव्या कृषी कायद्यांमुळे देवी दुर्गाची शक्ती कमी केली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. एवढेच नाही, तर "जेव्हा भाजप आणि आरएसएसच्या कुण्या व्यक्तीची शिक्षण संस्थांमध्ये नियुक्ती केली जाते, तेव्हा देवी सरस्वतीची शक्ती कमी होते," असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "देशावरील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद कमी झाला आहे. "काल मी मंदिरात (वैष्णो देवी) गेलो, तेथे मला तीन देवी दिसल्या. दुर्गाजी, लक्ष्मीजी आणि सरस्वतीजी. दुर्गा हा शब्द 'दुर्ग' या शब्दापासून बनला आहे आणि देवी दुर्गा म्हणजे संरक्षण करणारी शक्ती आहे. देवी लक्ष्मी ही एक अशी शक्ती आहे, जी एखादे ध्येय साध्य करण्यास मदत करते. तर देवी सरस्वती शिक्षण आणि ज्ञानाची शक्ती आहे. जेव्हा देशात या तीनही शक्ती असतात तेव्हा देश समृद्ध होतो,'' असेही राहुल गांधी म्हणाले.