नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत अवघ्या ५२ जागांवर समाधान मानावे लागणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी देशात मोदींची लाट असल्याचे मान्य केले आहे. मोदींच्या लोकप्रियतेच्या लाटेत सगळेच वाहून गेले, असं विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं आहे. फर्रुखाबाद येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.
देशात मोदींची त्सुनामी आहे, असे भाजपच्या नेत्यांनी अनेकदा सांगितले. पण पहिल्यांदाच काँग्रेसच्या नेत्याने मोदींची लोकप्रियता असल्याचे मान्य केले आहे. सलमान खुर्शीद यांनी देशात मोदी लाट असल्याचं मान्य केलं आहे. देशात मोदींची त्सुनामी आली असून त्यात सगळे वाहून गेले आहेत. आम्ही जिवंत आहोत आणि बोलू शकत आहोत हेच नशीब मानायचे असं खुर्शीद म्हणाले.
मोदींच्या लाटेत आजही काँग्रेस पक्ष जिवंत राहण्यास यशस्वी राहिला आहे. मोदींची लोकप्रियतेला आम्ही नाकरणे म्हणजेच, निवडणुका मान्य नसल्याचा त्याचा अर्थ होतो. २०१४ च्या निकाल पहिला तर यावेळी आम्हाला आठ जागांचा फायदा झाला असल्याचे, खुर्शीद म्हणाले.
खुर्शीद यांनी फारुकाबाद मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ ला लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र दोन्हीवेळा त्यांचा दारूण पराभव झाला. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खर्शीद यांनी मोदींबद्दल विधान करताना देशात मोदींची त्सुनामी आली असल्याचे विधान केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खुर्शीद यांना जेमतेम ५५,००० मतं मिळाली होती.