जयपूर : राजस्थानमध्ये शालेय अभ्यासक्रम बदलण्यावरून सत्ताधारी काँग्रेसचे नेते आमने-सामने उभे ठाकले आहेत. सती प्रथा तसेच जोहर प्रथेशी संबंधित बदलावरून शिक्षणमंत्री ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करीत आहेत, असा आरोप नेत्यांनी केला आहे.दळणवळणमंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी पत्रकारांना सांगितले, जोहरबाबत सर्वांना समजले पाहिजे. नेता, मग तो काँग्रेसचा असो की भाजपचा, त्याने विचार न करता भाषणबाजी करू नये. मंत्रीपदावर बसलो म्हणजे आम्ही इतिहास बदलू शकत नाहीत. इतिहास जसा असेल तसाच राहील. भाजपने जी चूक केली आहे, ती आम्ही करणार नाहीत.काँग्रेसचे माजी खासदार व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोपाल सिंह ईडवा यांनीही शिक्षणमंत्र्यांच्या जोहरबाबतच्या वक्तव्यावर आपली असहमती दर्शवली. ते म्हणाले की, जोहरसंदर्भात छेडछाड करणे हे ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्याही ठीक नाही. मी याबाबत उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आहे व मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाही पत्र लिहिणार आहे. शालेयमंत्र्यांना सती व जोहरमधील फरक माहीत नसावा, अशी टीकाही त्यांनी केली.राज्यातील नवीन काँग्रेस सरकारने अभ्यासक्रमात काही बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार, आठवीच्या वर्गातील इंग्रजीच्या पहिल्या धड्यात सती किंवा जोहरसंबंधित एक चित्र हटवून केवळ दुर्गाचे चित्र लावावे, असा विचार पुढे आला आहे. मात्र, त्यावरून राज्यात वादाला तोंड फुटले आहे.त्यातच शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांनी म्हटले आहे की,सती प्रथेवर बंदी आहे, तर जोहरचा इंग्रजी पुस्तकाशी काय संबंध आहे? हे चित्र जोहरशी संबंधित आहे की सती प्रथेशी संबंधित आहे, हेही स्पष्ट केलेले नाही.शिक्षणमंत्र्यांनाच आणखी शिक्षणाची गरज - भाजपभाजप नेतेही शालेय अभ्यासक्रम बदलण्याच्या प्रस्तावावर सतत टीका करीत आहेत. पक्षाचे नेते अभिमन्यू सिंह रजवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकारने महाराणा प्रताप यांना महान नव्हते असे सांगून, जोहरचे चित्र हटविण्याचा, तसेच विनायक दामोदर सावरकर यांच्या नावापुढील वीर शब्द हटवण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी दिलेली भावनिक मुद्यावरील वक्तव्ये पाहता त्यांनाच आणखी शिक्षणाची गरज आहे, अशी टीकाही केली.
शालेय अभ्यासक्रम बदलावरून सत्तारूढ काँग्रेसचे नेते आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:26 AM