काँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल थांबवावी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:06 AM2021-05-12T06:06:06+5:302021-05-12T06:10:18+5:30
सोनिया गांधी यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाच्या परिस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणी केली होती.
नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीवरून मोदी सरकारवर काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या टीकेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर टीका केल्यानंतर नड्डा यांनी कोरोनाच्या संकटामध्ये काँग्रेसच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पलटवार केला. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर नड्डा यांनी टीका केली आहे.
सोनिया गांधी यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाच्या परिस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणी केली होती. तसेच सरकारच्या लसीकरण धोरणावरूनही त्यांनी जोरदार टीका केली. त्या टीकेला नड्डा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. नड्डा यांनी सांगितले, की काँग्रेसचे काही नेते कोरोनाच्या संकटकाळात चांगले काम करत आहेत. मात्र, पक्षातील काही नेत्यांकडून पसरविण्यात येत असलेल्या नकारात्मकतेमुळे त्यांच्या कामावर ग्रहण लावले जात आहे. काही जणांची अशी इच्छा आहे, की भारत कोरोनाचा अतिशय धैर्याने लढा देत असताना काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने सातत्याने विरोधाभासी भूमिका घेणे सोडावे आणि जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असे नड्डा यांनी सांगितले.
मोफत लसीवरून हल्लाबोल
भाजपा आणि एनडीएचे सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये गरीब व वंचितांना मोफत लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये असणाऱ्या सरकारलाही गरिबांबद्दल अशाच भावना असतील, याची मला खात्री आहे. तेदेखील मोफत लस देण्याचा असा निर्णय घेऊ शकतात का, असा प्रश्नही जे. पी. नड्डा यांनी केला आहे.