काँग्रेसला कमी झालेले मतदान पडले ‘आप’ उमेदवारांच्या पथ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:48 AM2020-02-13T04:48:08+5:302020-02-13T04:48:21+5:30
मिळाली सव्वाचार टक्के मते; १0 मतदारसंघांत विजय झाला सुकर
नवी दिल्ली : काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या कमी मतांचा फायदा ‘आप’च्या उमेदवारांना मिळाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४.२६ टक्के मते मिळाली. ‘आप’ला ५३.५७ टक्के तर भाजपला ३८.५१ टक्के मते मिळाली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला १० टक्के मते मिळाली होती. काँग्रेसच्या मतांमध्ये सुमारे ६ टक्के घट झाल्यानेच आपच्या उमेदवारांना फायदा झाला. जवळपास १० मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना कमी मतदान झाल्याने आपच्या उमेदवारांचा विजय सुकर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिजवासन मतदारसंघात आपचे उमेदवार भूपिंदरकुमार जून केवळ ७५३ मतांनी विजयी झाले. तिथे काँग्रेसच्या परवीन राणा यांना ५,९३७ मते मिळाली आहे. कस्तुरबानगर मतदारसंघातील आप उमेदवार केवळ ३,१६५ मतांनी विजयी झाले. तिथे काँग्रेसचे अभिषेक दत्त यांना १९,६४८ मते मिळाली.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही केवळ ३,२०७ मतांनी निवडून आले आहेत. तिथे काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण रावत यांना २,८०२ मते मिळाली. कृष्णानगरमध्ये आपचे एस. के. बग्गा ३,९९५ मताधिक्यांनी निवडून आले आहेत. तिथे काँग्रेसचे अशोककुमार वालिया यांना ५,०७९ मते मिळाली आहेत.
या मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांना याहून किंचित अधिक मते मिळाली असती, तर आपच्या उमेदवारांना विजयी होणे अवघड झाले असते.