काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी लखनौमध्ये सांगितलं की, लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करत आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत असताना काँग्रेस अध्यक्षांनी असं म्हटलं आहे.
इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशातील वातावरण पाहता आम्ही असं म्हणू शकतो की, इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करत आहे."
"2024 ची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. ही विचारधारेची निवडणूक आहे. एकीकडे गरिबांच्या बाजूने लढणारे पक्ष एकजुटीने लढत आहेत. दुसरीकडे श्रीमंतांसोबत राहून जे अंधश्रद्धेसाठी लढत आहेत ते एकत्र लढत आहेत. हे लोक धर्माच्या आधारावर लढत आहेत."
"आमचा लढा गरिबांच्या बाजूने आहे. ज्यांना एक वेळचे जेवण मिळत नाही, ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. पदवी आणि डिप्लोमा करूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. सरकारमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, पण त्या जागा भरायला केंद्र तयार नाही."
"इंडिया आघाडी बेरोजगारी आणि महागाईविरोधात लढत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे, अन्यथा आपण गुलामगिरीत जाऊ. प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. जर लोकशाही नसेल आणि हुकूमशाही असेल, तर तुम्ही कस मतदान कराल?" असं देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.