Congress MP Praniti Shinde Criticized BJP:संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेच्या सभागृहांमध्ये इंडिया आघाडीचे सदस्य केंद्रातील भाजपा एनडीए सरकारला अनेक मुद्द्यांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अदानी, ईव्हीएम, मणिपूरवरून काँग्रेसकडून भाजपावर सातत्याने हल्लाबोल केला जात आहे. तर राज्यसभेत उपराष्ट्रपतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी इंडिया आघाडीने मोर्चेबांधणी केली आहे. यातच ईव्हीएमबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
संसद परिसरात मीडियाशी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आम्हाला संसदेचे कामकाज चालवायचे आहे. शून्य प्रहरात मणिपूर प्रश्नासंदर्भात चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. मणिपूरवासीयांच्या मनात तीन प्रश्न आहे. एक म्हणजे पंतप्रधान मोदी मणिपूरला केव्हा जाणार, दुसरे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेला याबाबत निवेदन कधी देणार आणि तिसरा प्रश्न म्हणजे मणिपूरबाबत चर्चा करायची नसल्याने सोरोस प्रकरणाची ढाल करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. हे तीन मुद्दे आम्ही मांडतो, तेव्हा भाजपा खूपच अस्वस्थ होते, अशी खोचक टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार
पुढे बोलताना प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, भाजपाला कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची नाही. मग तो ईव्हीएमचा मुद्दा असो, अदानींचा मुद्दा असो की मणिपूरचा मुद्दा असो. त्यामुळेच भाजपाला संसदेचे कामकाज चालवायचे नाही, हेच यातून दिसते, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच ईव्हीएमबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. महाराष्ट्र आणि हरयाणातील निकाल ईव्हीएममध्ये फेरफार करून लागलेले आहेत. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ईव्हीएम मुख्यमंत्री आहेत. जनतेत नाराजी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडते आहे की, एखाद्या पक्षाला एवढा मोठा जनधार मिळूनही जनता आनंदी दिसत नाही. ज्यांच्यासाठी मतदान केले, ते निवडून न आल्याची खंत मतदारांमध्ये आहे, असा मोठा दावा प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस अदानी मुद्द्यावरून सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधकांमध्ये दररोज खडाजंगी पाहायला मिळत आहे. विरोधक संसदेबाहेरही रोज नवनव्या पद्धतीने आंदोलन करताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. अदानी मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. संसदेसह बाहेरदेखील या मुद्द्यावरुन काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.