भाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 08:16 AM2018-10-23T08:16:11+5:302018-10-23T09:13:10+5:30
मुख्यमंत्री रमण सिंह यांना राजनांदगांव मतदारसंघातून आव्हान देणार
रायपूर: छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात काँग्रेसनं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. रमण सिंह राजनांदगांव मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा त्यांच्यासमोर करुणा शुक्ला यांचं आव्हान असेल. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह राजनांदगांव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी त्यांना अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे रमण सिंह यांच्यासमोर कडवं आव्हान आहे. करुणा यांनी काही वर्षांपूर्वी भाजपाला राम राम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. करुणा शुक्ला 1993 मध्ये पहिल्यांदा भाजपाच्या तिकीटावर आमदार झाल्या. यानंतर त्यांनी संसदेत जांजगीर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. गेल्या 4-5 वर्षांपासून त्या सातत्यानं भाजपा नेतृत्त्व आणि रमण सिंह यांच्यावर टीका करत आहेत. भाजपा नेतृत्त्वानं फारसं महत्त्व न दिल्यानं नाराज झालेल्या करुणा शुक्ला यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं त्यांना बिलासपूरमधून उमेदवारी दिली. मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या.
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. यातील 18 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान घेतलं जाईल. काँग्रेसनं पहिल्या टप्प्यातील 18 जागांपैकी 12 जागांवरील उमेदवार आधीच जाहीर केले होते. यानंतर 6 उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काल जाहीर करण्यात आली. छत्तीसगडमध्ये 12 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल. 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.