दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन केल्यावर अजूनही काँग्रेसची परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. एकीकडे संजय सिंग, भुवनेश्वर कलिता यांच्यासारख्या राज्यसभेच्या खासदारांनी राजीनामा दिलेला आहे तर दुसरीकडे कर्नाटक आणि गोव्यासारख्या राज्यातही पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. अशावेळी कलम ३७०च्या वेळीही पक्षातील मतभेद समोर आले होते. येत्या काही दिवसात हरियाणातही पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर रविवारी रोहतक येथे शक्तिप्रदर्शन करत पक्षालाच खडे बोल सुनावले आहेत. यावेळी काँग्रेसचा रस्ता भरकटला आहे असे सुनावयालाही त्यांनी मागे-पुढे बघितले नाही. ते म्हणाले की, 'काँग्रेस आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. कलम ३७० हटवण्यास माझा पाठिंबा होता मात्र पक्षातील काही नेते त्याच्या विरोधात होते. जेव्हा सरकार कोणताही योग्य निर्णय घेत असेल तर त्याचे समर्थन करणे गरजेचे आहे. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ३७० कलम हटवण्यास विरोध केला त्यावरून पक्ष रस्ता भरकटल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीत कधीही स्वाभिमान आणि देशभक्तीची वेळ येते तेव्हा मी कधीही मागे-पुढे बघणार नाही'. पुढे ते म्हणाले की, मी हरियाणा सरकारला प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी मागील पाच वर्षात काय केले. त्यांना आता एकट्या ३७० कलमाच्या मुडद्यामागे लपून निवडणूक लढवता येणार नाही. हरियाणामधील अनेक तरुण काश्मीरमध्ये शिपाई म्हणून कर्तव्य बजावत असल्यामुळे या निर्णयाला समर्थन दिले होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार ? हुड्डा यांनी बोलताना ज्या पद्धतीने स्वतःच्या पक्षाला आणि सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे ते बघता आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते स्वतःचा वेगळा पक्ष काढण्याची शक्यता आहे. या रॅलीमध्ये त्यांनी त्यांच्या गटाच्या व्यतिरिक्त कोणत्याही काँग्रेस नेत्याला आमंत्रित केले नव्हते. त्यातच त्यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या अशोक तंवर यांच्याचकडे राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे कायम ठेवल्यामुळे हुड्डा यांच्या नाराजीचा भर पडली आहे.