लंडन - 'काँग्रेसची सुरुवात अनिवासी भारतीयांनी केलेली आहे. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे सर्व अनिवासी भारतीय होते', असे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केले आहे. 'या सर्वांनी आधी जग पाहिलं, जगभर घडणाऱ्या घडामोडी, चळवळी पाहिल्या आणि देशाला पुढे नेण्यासाठी योगदान दिले', असेही राहुल गांधींनी यावेळी म्हटले. लंडन येथे 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस'ला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलेले आहे. यावेळेस त्यांनी भाजपावर निशाणार साधला. 'क्रोध आणि द्वेष मिटवण्यासाठीची शक्ती काँग्रेसमध्ये आहे. देशाला अखंड ठेवण्यावर काँग्रेसचा भर आहे, असंही त्यांनी सांगितले.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. 'पंतप्रधान मोदी म्हणतात की, मी सत्तेत येण्यापूर्वी देशात काहीच झाले नव्हते. असे बोलून ते भारतीयांची खिल्ली उडवत आहेत. लालकिल्ल्यावरुन त्यांनी म्हटलं की, भारत झोपलेला हत्ती होता, मी त्याला जागं केले आहे. पंतप्रधान मोदींमध्ये किती अहंकार आहे, हे त्यांच्या विधानावरुन दिसून येते. देश केवळ एका व्यक्तीमुळे नाही, तर जनतेमुळे घडला आहे, हे त्यांना समजायला हवे', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला.
(वाचा :काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी नेमल्या तीन महत्त्वाच्या समित्या)
राहुल गांधी पुढे असंही म्हणाले की, गेल्या 70 वर्षात अगदी सर्व काही काँग्रेसने केलेले नाही. पण देशाचा जो काही विकास झालाय त्यात काँग्रेसचाही हातभार आहे. जनतेने हिंमत दाखवली आणि त्या हिमतीला आम्ही मार्ग दाखवला, व देशाला पुढे आणण्यासाठी त्यात भागीदार झालो. काँग्रेस देशाला जोडण्याचं काम करते. पण भाजपाने सत्तेत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि आरबीआयला कमकुवत करण्याचे काम केले आहे, असा घणाघातही त्यांनी केला.
''लोकांना सांगा... भारताला बदललं जात आहे, एकत्ररित्या पुढे जाण्याची त्याची शक्ती तोडण्याचं काम सुरू आहे. जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधा'', असा सल्ला यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.