लंडन: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. दोन दिवस जर्मनीला थांबल्यानंतर आता राहुल गांधीलंडनमध्ये आहेत. राहुल गांधी सध्या परदेशातील भारतीयांशी संवाद साधत आहेत. परदेशांमधील व्यासपीठांवरुनही राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. मात्र याठिकाणीही राहुल गांधी यांना त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरुन प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांसाठी लंडनमध्ये असलेल्या राहुल यांना 'तुमच्याकडे गांधी या आडनावाशिवाय आणखी काय आहे?,' असा प्रश्न विचारण्यात आला. 'आडनावाव्यतिरिक्त तुमच्याकडे काय आहे? तुम्ही आयुष्यात काय साध्य केलं आहे?', अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधींवर करण्यात आली. यावर माझी बाजू ऐकल्याशिवाय माझ्याबद्दल निष्कर्ष काढू नका, असं उत्तर राहुल यांनी दिलं. 'शेवटी निवड तुम्ही करायची आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन टीका करायची की माझ्या क्षमतेच्या आधारे माझी योग्यता ठरवायची, हे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे,' असं राहुल म्हणाले. माझ्या वडिलांनंतर कुटुंबातील कोणाकडेही सत्तेतील पद नव्हतं, याकडे राहुल गांधी यांनी पत्रकारांचं लक्ष वेधलं. 'माझे वडील पंतप्रधान होते. मात्र त्यानंतर माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे पंतप्रधानपद किंवा मंत्रीपद नव्हतं, याचा अनेकांना विसर पडला आहे,' असं राहुल यांनी म्हटलं. 'मी जे बोलतो, ते तुम्ही ऐका. विविध मुद्यांवर माझ्याशी संवाद साधा. परराष्ट्र निती, आर्थिक धोरणं, भारतीय विकास, कृषी या विषयावर माझे विचार करा. माझ्याशी चर्चा करा. आधी माझ्याशी बोला आणि मग निष्कर्ष काढा,' असं आवाहनही त्यांनी केलं.
'आडनावाशिवाय तुमच्याकडे काय आहे?'; राहुल गांधींनी दिलं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 2:04 PM