Priyanka Gandhi News( Marathi News ): संसद सुरक्षेतील त्रुटी आणि लोकसभेतील घुसखोरी यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात यासंदर्भात निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवरून संसदेत झालेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील १४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यावरून विरोधी पक्ष केंद्रावर सातत्याने टीका करताना दिसत आहे. यातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मणिपूरमधील एका घटनेचा उल्लेख करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
विरोधकांनी संसद परिसर ते विजय चौकतपर्यंत पदयात्रा काढत खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईविरोधात निषेध केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी टीव्हीवर बोलतात, रेडिओवर बोलतात, पण सभागृहात बोलत नाही. संसदेतील घुसखोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावे, हीच आमची मागणी आहे, असे सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रावर टीका केली. यानंतर प्रियंका गांधी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमधून भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
भाजपाच्या राज्यात संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही
प्रियंका गांधी यांनी मणिपूरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये या हिंसाचारात बळी पडलेल्यांवर नातेवाइक अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत. जरा विचार करा की, मणिपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांवर आठ महिन्यांनंतरच अंत्यसंस्कार करण्यात आले. मणिपूरबाबत संसदेत प्रश्न विचारला असता, सरकारने जबाबदारी घेण्याऐवजी विसंगत उत्तरे दिली. आता खुद्द पंतप्रधान ज्या संसदेत बसतात ती संसदही सुरक्षित राहिलेली नाही, तर सुमारे दीडशे खासदारांना प्रश्न विचारल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. भाजपाच्या राजवटीत संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यावरुन भाजपावर जोरदार टीका करत कारवाई मागचे कारण सांगितले. संसदेचे सदस्य नसताना काही लोक सदनमध्ये आले, या लोकांना पास कुठून मिळाला. ते सदनमध्ये कसे आले? याबाबत सरकारकडून माहिती मिळण्याची आवश्यक्ता होती. सदनचा तो अधिकार होता, आम्ही स्टेटमेंटची मागणी केली होती तेच त्यांनी दिलेली नाही. यामुळेच सदनमधील सदस्यांना निलंबित केले, आजपर्यंत अशी गोष्ट कधीही झालेली नाही. विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करुन काम करणे सुरू आहे. पण, देशाची जनता हे सर्व पाहत आहे. जी मिमिक्री केली ती सदनच्या बाहेर केली आहे. संसदेत बोलू दिले जात नाही. खासदारांनी सरकारला प्रश्न विचारले म्हणून त्यांना निलंबित केले. खासदारांचे असे निलंबन करणे चुकीचे आहे, अशी टीका शरद पवारांनी केली.