नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसच्या नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रियंका गांधी यांच्या "मी मुलगी आहे आणि मी लढू शकते" या विधानाची खिल्ली उडवत निशाणा साधला आहे. तसेच "घरात मुलगा आहे (राहुल गांधी), पण लढू शकत नाही" असं म्हणत स्मृती इराणी यांनी राहुल यांना सणसणीत टोला लगावला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात इराणी यांनी राहुल गांधीसह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
स्मृती इराणी यांनी "उत्तर प्रदेशमधील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल अशी आम्हाला आशा आहे. तसेच या निवडणुकीत धोरण आणि विकास आणि लोकशाही मजबूत करण्यावर चर्चा होईल" असं म्हटलं आहे. महिला उमेदवारांना 40 टक्के तिकिटे देण्याच्या प्रियंका गांधींच्या प्रस्तावावर इराणी यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. "याचा अर्थ त्यांना 60 टक्के तिकिटे महिलांना द्यायची नाहीत असा होतो. राजकारणात आणि लोकशाहीत लोकांनी प्रयत्न करू नये, असे माझे म्हणणे नाही. जय-पराजय हा राजकारणाचा भाग आहे" असं देखील म्हटलं आहे.
"देशातील नागरिक राजकीय विश्लेषण करू शकत नाहीत"
"2014 मध्ये माझाही पराभव झाला पण तुमच्या प्रयत्नांवर लोकांचा किती विश्वास आहे हा प्रश्न आहे. तसेच महिला नेत्यांकडून फक्त समाजातील महिला सदस्यांसाठी काम करण्याची अपेक्षा करू नये" असंही इराणी यांनी म्हटलं आहे. भाजपा ध्रुवीकरणाच्या फॉर्म्युल्यावर काम करते का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, "या देशातील नागरिक राजकीय विश्लेषण करू शकत नाहीत आणि कोणत्यातरी फॉर्म्युल्यावर मतदान करतील, असे तुम्हाला वाटते का?" असं म्हटलं आहे.
अखिलेश यादव यांच्या विधानाचा इराणींनी घेतला समाचार
अखिलेश यादव यांनी 31 ऑक्टोबरला एका कार्यक्रमात महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना बॅरिस्टर झाले आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि कधीही मागे हटले नाही, असं विधान केलं होतं. अखिलेश यादव यांच्या विधानाचा समाचार घेत इराणी यांनी ही तुलना पुन्हा दर्शवते की, "मुलं आहेत, पण ते लढू शकत नाहीत. सरदार पटेल अतुलनीय आहेत. पाचशे संस्थानांमध्ये एकतेची भावना जागृत करण्याचे श्रेय सरदार पटेलांना जाते. त्यांचे व्यक्तिमत्व किती महान असेल याची तुम्ही कल्पना करू शकता" असं म्हटलं आहे.