काँग्रेसनं 24 तासांपूर्वीच मला पक्षातून काढलं- शंकर सिंह वाघेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:30 PM2017-07-21T15:30:11+5:302017-07-21T15:39:38+5:30

काँग्रेसनं मला 24 तासांपूर्वीच पक्षातून काढलं, असं गुजरातमधील काँग्रेसचे वजनदार नेते शंकर सिंह वाघेला म्हणाले आहेत.

Congress pulled me out of the party 24 hours ago - Shankar Singh Vaghela | काँग्रेसनं 24 तासांपूर्वीच मला पक्षातून काढलं- शंकर सिंह वाघेला

काँग्रेसनं 24 तासांपूर्वीच मला पक्षातून काढलं- शंकर सिंह वाघेला

Next

ऑनलाइन लोकमत
गांधीनगर, दि. 21 - काँग्रेसनं मला 24 तासांपूर्वीच पक्षातून काढलं, असं गुजरातमधील काँग्रेसचे वजनदार नेते शंकर सिंह वाघेला म्हणाले आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाघेलांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. वाघेलांनी या कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन केलं असून, काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.

काँग्रेसचा होमवर्क कमी आहे. सध्या मी काँग्रेसमध्येच आहे, मात्र 24 तासांपूर्वीच मला पक्षातून काढून टाकलं आहे. त्यांना मी काय भूमिका घेईन याची भीती वाटली होती. विनाशकाले विपरित बुद्धी, म्हणत वाघेलांनी काँग्रेसला धारेवर धरलं आहे. मी लोकांसाठी नेहमीच उपस्थित असेन, जनतेसाठी नीळकंठ बनण्यास मी तयार आहे. भगवान शंकरानं मला विष प्राशन करणं शिकवलंय. लोकांसाठी मी विष पिण्यासही तयार आहे.

सध्या मी 77 वर्षांचा आहे. मात्र मी कधीही रिटायर्ड होणार नाही. हा माझ्या आयुष्यातला निर्णायक क्षण आहे. यावेळी वाघेला यांनी संघाच्या शिस्तीचंही कौतुक केलं आहे. संघानं मला लोकांची सेवा करण्यास शिकवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यात समेट घडवून आणल्याचंही वाघेलांनी सांगितलं आहे. आम्ही आमदार आणि खासदार बनवणारे आहोत. संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मेहतन घेऊन केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वात 1995मध्ये भाजपाला सत्तेत आणलं. मी सत्तेसाठी कधीच लाचार झालो नाही, असंही वाघेला म्हणालेत.

आणखी वाचा
(कोण आहेत शंकरसिंह वाघेला?)
विधानसभा निवडणुकीआधी गुजरात काँग्रेसमध्ये फाटाफूट ?
नागालँडच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी

47 आमदारांच्या मदतीने भाजपाविरोधात बंड करणारे वाघेला !

शंकरसिंह वाघेला हे पुर्वी जनसंघाचे त्यानंतर जनता पार्टीचे आणि नंतर भारतीय जनता पार्टीचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. 1996 साली त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांना एका वर्षासाठी गुजरातचे मुख्यमंत्रिपदही भूषवता आले. 1997 साली त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. वाघेला हे पाच वेळा लोकसभेत निवडून गेले असून 1984 ते 1989 या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. संपुआ सरकारमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये ते वस्त्रोद्योग मंत्री होते. सध्या ते गुजरातच्या कापडवंज मतदारसंघातून गुजरात विधानसभेचे सदस्य आहेत.
1995 साली वाघेला यांनी 47 आमदारांच्या मदतीने भाजपाविरोधात बंड केले होते. हे बंड शांत करण्यासाठी केशुभाई पटेल यांच्याऐवजी सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्यात आले. 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोध्रा मतदारसंघातून लढताना वाघेला यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह पक्ष सोडून राष्ट्रीय जनता पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही झाले. मात्र 1997 त्यांना पदावरून बाजूला व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्या जागी दिलीप पारिख हे मुख्यमंत्री झाले. पण पारिख यांचेही सरकार फार काळ चालू शकले नाही. अखेर 1998 साली विधानसभेची निवडणूक घेण्यात आली आणि त्यानंतर भाजपा पुन्हा सत्तेमध्ये आला आणि केशुभाई पुन्हा मुख्यमंत्री झाले.

 

Web Title: Congress pulled me out of the party 24 hours ago - Shankar Singh Vaghela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.