Rahul Gandhi : "रोजगार मागणाऱ्यांना सरकारने लाठ्या दिल्या, भाजपा मतं मागायला येईल तेव्हा हे लक्षात ठेवा" 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 03:58 PM2021-12-05T15:58:18+5:302021-12-05T16:12:23+5:30

Congress Rahul Gandhi And Priyanka Gandhi : काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कारवाईवरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Congress Rahul Gandhi statement on incident of lathi charge of people | Rahul Gandhi : "रोजगार मागणाऱ्यांना सरकारने लाठ्या दिल्या, भाजपा मतं मागायला येईल तेव्हा हे लक्षात ठेवा" 

Rahul Gandhi : "रोजगार मागणाऱ्यांना सरकारने लाठ्या दिल्या, भाजपा मतं मागायला येईल तेव्हा हे लक्षात ठेवा" 

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये 69 हजार सहाय्यक शिक्षकांच्या भरतीचे प्रकरण जोर धरत आहे. अनियमिततेचा आरोप करत उमेदवार सातत्याने आंदोलन करत आहेत. दरम्यान, लखनऊमध्ये कँडल मार्च काढणाऱ्या उमेदवारांवर पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर राजकीय वर्तुळात याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कारवाईवरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच या लाठीचार्जचा निषेध केला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देखील ट्वीट करत योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "रोजगार मागणाऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारने लाठ्या दिल्या. भाजपा जेव्हा मतं मागायला येईल तेव्हा हे लक्षात ठेवा" असं म्हटलं आहे. यासोबतच राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी आंदोलक तरुणांवर केलेल्या लाठीचार्जचा एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे. प्रियंका गांधी यांनी "उत्तर प्रदेशचे तरुण हातात मेणबत्तीचा प्रकाश घेऊन रोजगार द्या ही मागणी करत होते. मात्र योगी सरकारने त्या तरुणांवर लाठीचार्ज केला. तरुणांनो यांनी कितीही लाठीचार्ज करू द्या, रोजगाराच्या हक्काची लढाई थांबू देऊ नका. या लढाईत मी तुमच्यासोबत आहे" असं म्हटलं आहे. 

"ही तुमची मुलं असती तर त्यांनाही अशीच वागणूक मिळाली असती का?"

प्रियंका गांधी यांनी याआधी उत्तर प्रदेशमधील सहशिक्षक भरती घोटाळ्यावर हल्लाबोल केला होता. "उत्तर प्रदेश टीईटी परीक्षा घोटाळ्याचा मास्टरमाईंड भाजपा आमदाराचा भाऊ आहे. योगी आदित्यनाथ यांची सक्ती आणि पारदर्शकतेच्या गप्पा पोकळ आहेत" असं म्हटलं आहे. भाजपा खासदार वरुण गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. वरुण गांधी लाठीचार्जचा व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले की, 'ही तुमची मुलं असती तर त्यांनाही अशीच वागणूक दिली असती का? ही मुले भारतमातेचे लाल आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवणे तर दूरच, कोणीही त्यांच म्हणणं ऐकायला तयार नाही. त्यातच त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला गेला. मनावर हात ठेवून विचार करा की ही तुमची मुलं असती तर त्यांनाही अशीच वागणूक मिळाली असती का?' असा सवाल त्यांनी विचारला आहे.

काही दिवसांपूर्वीच UPTET भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये यूपी पोलिसांनी 26 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणावरुन काँग्रेस, समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनीही यूपी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधकही या प्रकरणावरुन भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत.
 

Web Title: Congress Rahul Gandhi statement on incident of lathi charge of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.