पाटणा- बिहारमध्ये काँग्रेस नेत्यांनी लावलेली होर्डिंग्ज सध्या फारच चर्चेत आली आहेत. या होर्डिंग्जवर नेत्यांच्या फोटोबरोबर त्यांच्या जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिवानं हे होर्डिंग्ज लावले आहेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्जमध्ये राहुल गांधींच्या फोटोखाली त्यांची जात ब्राह्मण अशी लिहिण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नरेंद्र मोदींनी काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष म्हटल्यामुळेच आम्ही जातीसह होर्डिंग्ज छापल्याचा दावा या सचिवानं केला आहे. पाटण्यातल्या सदाकत आश्रम, राजापूर पूल, तारामंडळ, बोअरिंग कॅनाल रोडसह अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव सिद्धार्थ क्षत्रिय यांनी ही होर्डिंग्ज लावल्याचं आता समोर आलं आहे.काँग्रेसचे सिद्धार्थ क्षत्रिय म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष म्हटलं आहे. त्यांचा हा दावा खोडून काढण्यासाठीच आम्ही ही होर्डिंग्ज लावली आहेत. नव्या प्रदेश कमिटीमध्ये सर्व जातींचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या होर्डिंग्जमध्ये राहुल गांधींच्या फोटोच्या खाली जात-ब्राह्मण असं लिहिण्यात आलं आहे. या होर्डिंग्जमध्ये अखिलेश सिंह आणि श्यामसुंदर सिंह, धीरज भूमिहारही दिसतायत.बिहारचे काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वीरेंद्र सिंह राठोड, समीर सिंह राजपूत, अल्पेश ठाकूर आणि सदानंद सिंह मागास वर्गातील असल्याचं या होर्डिंग्जवर छापण्यात आलं आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह चार कार्यकारी अध्यक्ष, अभियान समितीचे अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं एक मोठी समितीही बनवली आहे.