मुंबई : काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 21 उमेदवारांची घोषणा केली असून त्यात महाराष्ट्रातील 5 तर उत्तर प्रदेशातील 16 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉ. नामदेव उसेंदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढणार आहेत. तर गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपावर आरोप करत काँग्रसध्ये दाखल झालेल्या नाना पटोल यांना नागपूर मतदार संघातून उमेवारी देण्यात आली आहे. याशिवाय, उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघातून डॉ. नामदेव उसेंदी निवडणूक लढणार आहेत. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
याचबरोबर, काँग्रेसचे नेते राज बब्बर उत्तरप्रदेशातील मुरादाबादमधून निवडणुक लढणार आहेत. तर, गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सावित्रीबाई फुले यांना बहराइचमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली होती. या यादीत गुजरातच्या चार आणि उत्तर प्रदेशच्या 11 जागांचा समावेश होता. यामध्ये राहुल गांधी अमेठी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.