सुल्तानपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेस महिला नेत्यावरील हल्ल्याबाबत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. काँग्रेसच्या महिला नेत्याने स्वत:वरच गोळी झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. रिता यादव असं या महिला नेत्याचं नाव आहे. पक्षात स्वत:चं महत्व वाढवण्यासाठी रिता यादवनं हे षडयंत्र रचल्याचं समोर आलं आहे. पक्षात राजकीय वजन वाढवण्यासाठी रिता यादवने हे कृत्य केले.
सुल्तानपूर येथे १६ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वांचल एक्सप्रेस वेचं लोकार्पण करण्यासाठी पोहचले होते. त्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींच्या जनसभेत रिता यादव यांनी काळे झेंडे दाखवत योगी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवले म्हणून रिता यादव प्रसिद्धीझोतात आली. सगळीकडे तिच्या बातम्या झळकू लागल्या. त्यानंतर ३ जानेवारीला रिता यादवनं पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता त्यातून खळबळजनक खुलासा बाहेर आला.
स्वत: रचलं हल्ल्याचं षडयंत्र
रिता यादव हिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली की, लखनऊ वाराणसी बायपास मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी रिता यादव यांच्या पायात एक गोळीही लागली. जखमी अवस्थेत रिता यादवला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्याची तक्रार रिताने पोलिसांकडे करत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. काँग्रेसनेही या मुद्द्याचं राजकारण करत योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला. परंतु पोलिसांनी जेव्हा प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा त्यांना संशयास्पद गोष्टी आढळल्या.
असा केला खुलासा
पोलिसांच्या माहितीनुसार, रिता यादवने सहकारी माधव यादवसोबत मिळून या हल्ल्याचं षडयंत्र रचलं. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं तिकीट मिळावं म्हणून रिताने हा खेळ खेळला. रिता यादवने त्यांचा ड्रायव्हर मुस्तकीम, सूरज यादव आणि माधव यादव त्याचसह एका अज्ञात व्यक्तीशी हातमिळवणी करून स्वत:वर गोळी चालवली. हे लोक रिता यादवसोबत त्यांच्या गाडीत होते आणि घटना झाल्यानंतर तिथून फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर रिता यादवसह ३ लोकांना अटक केली. पकडलेल्या आरोपींकडून हत्यारं जप्त करण्यात आली आहे. रिता यादव यापूर्वी समाजवादी पक्षात होत्या. परंतु त्याठिकाणी सन्मानास्पद वागणूक मिळत नसल्याने अमेठी येथे प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत त्या काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या.