मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने हायटेक प्रचार करत बाजी मारली होती. स्मार्टफोन, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत भाजपने काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. आता याच तंत्रज्ञानाचा वापर करत काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कोंडी करण्याची योजना आखली आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून मोदींनी दिलेली आश्वासने शोधा आणि मोदी किती यशस्वी झाले, हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन काँग्रेसकडून लोकांना केले जाणार आहे.'२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी जनतेला काय काय आश्वासने दिली होती, याबद्दल स्मार्टफोनवर सर्च करण्याचे आवाहन काँग्रेसकडून करण्यात येईल. मोदींची आश्वासन किती फसवी होती, हे यामधून लोकांना समजेल,' असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने एका इंग्रजी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीआधीच्या सभा आणि रॅलींमध्ये काँग्रेसकडून ही रणनिती वापरली जाईल. 'मोदींची आश्वासने गुगल करा आणि ती कितीपत खरी ठरली हे तपासून पाहा', असे आवाहन काँग्रेसकडून केले जाणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदींना जनतेला 'अच्छे दिन' आणण्याचे आश्वासन दिले होते. मोदींच्या या आश्वासनांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनेकदा खिल्ली उडवली आहे. आता यापुढे जाऊन पुढील निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी लोकांना मोदींच्या आश्वासनांचे काय झाले हे गुगल करुन पाहा, असे आवाहन करणार आहेत. मोदींनी रोजगार, अर्थव्यवस्था, शेती, पायाभूत सोयीसुविधा, धार्मिक सलोखा, भ्रष्टाचार, काळा पैसा आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख अशी अनेक आश्वासने दिली होती. मोदी सरकारने ही सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत का?, हे गुगल करुन शोधण्याचे आवाहन काँग्रेसकडून केले जाणार आहे. या आवाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा काँग्रेस नेत्यांना आहे. यामुळे मोदींच्या आश्वासनांची नेमकी स्थिती काय आहे, हे लोकांना समजेल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते.
मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसला सापडला 'स्मार्ट' मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 10:54 AM