बंगळुरू, दि. 22- काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात प्रामाणिकपणा आणि कामाला स्थान कुठंलही स्थान नाही, अशी टीका काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी केली आहे. मी या पक्षासाठी कठोर मेहनत घेतली, पण आम्हाला पक्षात मान दिला जात नसल्याची निराशाही त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधील काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी एका कार्यक्रमात पक्षातील कार्यपद्धतीवर टीका केली आहे. काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात कामाचा आदर केला जात नाही. मी आणि इतर नेत्यांनी पक्षासाठी जे काम केलं त्याची दखल घेतली जात नाही. प्रामाणिकपणा आणि चिकाटीला या पक्षात स्थान नाही, असं म्हणत कर्नाटकातील आमदार केएन रंजना यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी नारायण राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका करत पक्षाला रामराम केला होता. नारायण राणेंच्या राजीनाम्यानंतर तसंच कर्नाटकातील या आमदाराने केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातील नाराजी दिसून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नारायण राणेंनी दिला काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा
नारायण राणे यांनी अखेर कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार तोफ डागली. काँग्रेसचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली. २00५मध्ये शिवसेना सोडल्यानंतर सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी आपली त्यांच्याशी भेट घडविली. या भेटीत आपल्याला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन देण्यात आलं होतं. 48 आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असतानाही आपल्याला डावलण्यात आलं. अशोक चव्हाण यांना आमदारांचा पाठिंबा नसताना मुख्यमंत्री करण्यात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले महसूल खाते काढून उद्योग खाते दिले. विधान परिषदेत ज्येष्ठ असूनही माझी गटनेतेपदी निवड झाली नाही़ यापुढे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून दसºयापूर्वी माझी पुढील दिशा जाहीर करेन, असं नारायण राणे म्हणाले आहेत.