पेगॅसस निकालाचे काँग्रेस, कायदेतज्ज्ञांकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 05:31 AM2021-10-28T05:31:19+5:302021-10-28T05:31:39+5:30
Pegasus : पेगॅसस पाळत प्रकरण हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तर राहुल गांधी यांना वारंवार खोटे बोलण्याची सवय आहे असा पलटवार भाजपने केला आहे.
नवी दिल्ली : पेगॅसस पाळत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची त्रिसदस्यीय समिती नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे काँग्रेस तसेच ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी स्वागत केले आहे. पेगॅसस पाळत प्रकरण हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तर राहुल गांधी यांना वारंवार खोटे बोलण्याची सवय आहे असा पलटवार भाजपने केला आहे. पेगॅससबाबत केंद्राने तत्परेतेने आपली योग्य भूमिका न्यायालयात मांडली नाही असा घरचा आहेर एनडीएमधील घटक पक्ष जनता दल (यू)ने भाजपला दिला आहे.
पेगॅससद्वारे करण्यात आलेले फोन टॅपिंग हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न होता. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती पेगॅसस प्रकरणातील सत्य नक्कीच शोधून काढेल असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, काही राज्यांचे मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, भाजपचे केंद्रीय मंत्री यांचेही फोन पेगॅससद्वारे टॅप करण्यात आले. त्यातून मिळणारी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पोहोचविली जात होती का?
पेगॅससद्वारे केलेल्या फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगत पेगॅससच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला आहे असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींना खोटे बोलण्याची सवय : भाजप
काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार खोटे बोलतात. पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती नेमण्याचा आदेश दिल्यानंतर राहुल गांधी पुन्हा खोटे बोलले आहेत अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. पात्रा म्हणाले की, लोकांची दिशाभूल करणे, खोटे बोलणे ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जुनी सवय आहे. भाजपचा लोकशाही यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे असेही ते म्हणाले.
केंद्राने योग्य भूमिका मांडली नाही : जेडीयू
पेगॅसस प्रकरणात केंद्राने तत्परतेने योग्य रितीने भूमिका न्यायालयापुढे मांडली नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने पेगॅससबाबत चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला अशी टीका भाजपप्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू) या पक्षाने केली आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. त्यागी म्हणाले, न्यायालयाने पेगॅसस प्रकरणी दिलेला आदेश ऐतिहासिक महत्वाचा आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कायदेतज्ज्ञांनी स्वागत केले आहे. खासगीपणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा ऐतिहासिक निकाल आहे असे कायदेतज्ज्ञांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. दुष्यंत दवे तसेच राकेश द्विवेदी, गीता लुथ्रा आदी ज्येष्ठ वकीलांनी पेगॅसस प्रकरणीच्या निकालाचे स्वागत केले आहे.