काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करेल, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:58 AM2017-12-18T00:58:43+5:302017-12-18T00:59:32+5:30
सचोटी, समान संधी, युवकांसाठी रोजगार आणि २५ कोटी गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याच्या कार्यक्रमाने काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली : सचोटी, समान संधी, युवकांसाठी रोजगार आणि २५ कोटी गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याच्या कार्यक्रमाने काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.
काँग्रेसच्या कल्पनेतील भारत भाजपाहून फार वेगळा आहे व तो साकार करण्यासाठी देशातील युवावर्ग राहुल गांधी यांना नक्की साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चिदंबरम यांनी व्टिट करत म्हटले आहे की, भारताबाबत आमचे विचार भाजपपेक्षा वेगळे आहेत. तरुणांनी आमच्या विचारांचे संरक्षण करावे असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. मला विश्वास आहे की, यावर तरुण निश्चित प्रतिक्रिया देतील.
काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, काँग्रेस सर्वसमावेशक राजकारण करत आहे आणि सर्व भारतीयांचा आम्ही सन्मान करतो. यात सत्तारुढ पक्षाचाही समावेश आहे. काँग्रेसने देशाला २१ व्या शतकात आणले तर, मोदी देशाला मध्ययुगीन काळात घेऊन जात
आहेत, अशी टीकाही त्यांनी केली होती.
शत्रुघ्न सिन्हा यांनी केले राहुल गांधींचे अभिनंदन-
पक्षाच्या अधिकृत भूमिकेहून वेगळा सूर लावत भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाध्यक्ष झाल्याबद्दल राहुल गांधी यांचे अभिनंदन करत काँग्रेसला दीर्घायुष्य चिंतिले. राहुल गांधी हे काँग्रेस अध्यक्ष होण्यासाठी नैसर्गिक व सर्वात योग्य उमेदवार असल्याचे टिष्ट्वट त्यांनी केले आहे. या शुभेच्छांबद्दल राहुल गांधी यांनीही शत्रुघ्नजींचे आभार मानले आहेत. तथापि, केंद्रीय राज्यमंत्री विजय गोयल यांनीही राहुल गांधी यांचे केले अभिनंदन केले आहे.