नवी दिल्ली - मध्यप्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपानंतर तिथे कमलनाथ यांचे सरकार राहिल की, कमळ फुलणार याचा निर्णय आज पाच वाजेपर्यंत होणार आहे. मध्यप्रदेश विधानसभेचे विशेष सत्र आज बोलविण्यात आले आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसने माघार घेतल्याचे चित्र आहे. काँग्रेसनेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कमलनाथ यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडे बहुमताचा आकडा नसल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले. पैसा आणि सत्तेच्या बळाचा वापर करून बहुमत असलेल्या पक्षाला अल्पमतात आणल्या गेल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज विधानसभेत कमलनाथ सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या फ्लोर टेस्टनंतरच मध्यप्रदेशात कमलनाथ खुर्चीवर कायम राहणार की, शिवराज सिंह चौहान पुनरागमन करणार हे स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ 12 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहे.
दरम्यान राजीनामा दिलेल्या 22 पैकी 6 आमदारांचे राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी आधीच मंजूर केले होते. आता उर्वरित 16 आमदारांचे देखील राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक मानले जातात. कमलनाथ सरकारला सध्या चार अपक्ष, दोन बसपा आणि एक समाजवादी पक्षाच्या आमदारांचे समर्थन आहे. अशा प्रकारे कमलनाथ सरकारकडे 99 चे संख्याबळ आहे. मात्र सरकार वाचविण्यासाठी हे पुरेस होणार नाही.