काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात, राहुल गांधी ६७ दिवसांत देश पिंजून काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 05:56 PM2024-01-14T17:56:32+5:302024-01-14T17:59:49+5:30
Bharat Jodo Nyaya Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून हिवरा झेंडा दाखवून या यात्रेला औपचारिक सुरुवात केली आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून हिवरा झेंडा दाखवून या यात्रेला औपचारिक सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सलमान खुर्शिद, राजीव शुक्ला, आनंद शर्मा, रणदीप सिंह सुरजेवाला, अशोक गहलोत, अभिषेक मनू सिंघवी, भूपेंद्र सिंह हुड्डा, सचिन पायलट, दिग्विजय सिंह, प्रमोद तिवारी यांच्यासह काँग्रेसचे सुमारे ७० हून अधिक नेते इंफाळ येथे दाखल झाले आहेत.
भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून ६ हजार ७१३ किलोमीटर अंतर पार करून २० मार्च रोजी मुंबईमध्ये समाप्त होणार आहे. यादरम्यान, राहुल गांधी हे ६०-७० काँग्रेस नेत्यांसह बसच्या माध्यमातून हे अंतर पार करणार आहेत. तसेच ही यात्रा काही प्रमुख ठिकामी पायी प्रवास करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत प्रवार केला आहे. ३५०० किमी चाललेली ही भारत जोडो यात्रा १२ राज्यांमधून गेली होती. तर भारत जोडो न्याय यात्रा १५ राज्यांमधून प्रवास करणार आहेत.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या यशावर सकारात्मक परिणाम होईल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही ६७ दिवसांमध्ये ११० जिल्ह्यामधून जाणार आहे. या यात्रेत राहुल गांधी हे तब्बल ३५५ लोकसभा मतदारसंघांना कव्हर करणार आहेत. हा आकडा देशातील एकूण लोकसभा मतदारसंघांपैकी ६५ टक्के एवढा आहे. २०१९ मध्ये भाजपाने या ३५५ मतदारसंघांपैकी २३६ मतदारसंघात विजय मिळवला होता. तर काँग्रेसला केवळ १४ जागा मिळाल्या होत्या. ही यात्रा मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांतूनही जाणार आहे. या राज्यांत काँग्रेसचा नुकताच पराभव झाला होता.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या यात्रेबाबत सांगितले की, ही यात्रा गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक अन्यायाला विचारात घेऊन काढण्यात येत आहे. काँग्रेस पक्ष सुरुवातीला ही यात्रा मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळ येथून सुरू होणार होती. मात्र राज्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे नंतर येथून २५ किमी अंतरावर असलेल्या थौबल जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.