नवी दिल्ली : ‘जैश-ए-मोहम्मद’च्या जम्मू-काश्मीरमधील दोन अतिरेक्यांनी, तुर्कमान गेट परिसरातील ‘हज मंजिल’वर बॉम्बहल्ला करण्याचे ठरविले होते. या मागे राजधानी दिल्लीत धार्मिक तणाव निर्माण करणे आणि त्याची खळबळ देश-विदेशात दूरपर्यंत पोहोचविणे हा हेतू होता.अब्दुल लतीफ (२९) आणि हिलाल अहमद भट (२६) यांना दोन दिवसांपूर्वी अटक झाली आहे. ते दिल्लीत दहशत पसरवू पाहत होते. विशेष शाखेने त्यांच्या केलेल्या चौकशीत ही बाब उघड झाली आहे. कटानुसार ते हातबॉम्ब फेकून पळून जाणार होते. मात्र त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी त्यांना पकडले.अब्दुल लतीफ आणि हिलाल अहमद भट यांनी दिल्लीतील गर्दी असलेल्या लाजपतनगरला लक्ष्य करण्याचे ठरविले होते. भरपूर गर्दी असलेल्या जागी बॉम्बस्फोट करु पाहणार होते. शिवाय ते पूर्व दिल्लीत गॅस पाईप लाईनचाही स्फोट करु पाहत होते. जामा मशीद परिसराचीही त्यांनी ‘रेकी’ केली होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली.लुटियन दिल्लीस्थित अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानांनाही ते लक्ष्य करणार होते. या परिसरात अनेक नेते आणि अधिकारी राहतात. ते कुणाला लक्ष्य करणार होते, याची माहिती पोलीस घेत आहेत. ‘धमाका बडा होना चाहिए और हिंदुस्तान रोना चाहिए’ अशी अतिरेक्यांमधील चर्चा कानी आल्यानंतर गुप्तचर यंत्रणेने दिल्ली पोलिसांना सावध केले. लतीफ याला दिल्लीत तर हिलाल याला जम्मू-काश्मीर मध्ये पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ हातबॉम्ब आणि पिस्टल, २६ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.पोलिसांना या अतिरेक्यांच्या नऊ साथीदारांचीही माहिती समजली आहे. सर्व जण काश्मीरमधील आहेत. त्यांनी यापूर्वीही अतिरेकी घटना घडविल्या आहेत. लष्करावर दगडफेक केली आहे. त्यांच्यावर जवानांवर हल्ला करण्याचे खटले दाखल आहेत. त्यांना पाकिस्तानमधून आर्थिक मदत मिळते. दिल्ली पोलिसांचे पथक काश्मीरमधील पोलिसांसह त्या नऊ जणांचा शोध घेत आहेत. ते हाती आल्यास अतिरेक्यांचे मोठे जाळे हाती येईल.‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख अजहर मसूद याच्यापासून प्रभावित होऊन दोघे अतिरेकी बनले. अब्दुल तलीफ याने एका मदरसामध्ये ४ वर्षे शिकविले आहे. या दरम्यान तो भडकावू विचार समाज माध्यमांमधून टाकू लागला. या माध्यमातून हजारो कट्टरपंथीय लोक त्याच्याशी जोडले गेले.शस्त्र पुरवठा करणाºया युवकाला अटकशस्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपात पोलिसांनी बारावीत शिकणाºया एका विद्यार्थ्याला निझामाबाद येथे शनिवारी अटक केली. कासिफ उर्फ निसार (१९) असे या युवकाचे नाव असून तो मेरठचा राहणारा आहे.१९ जानेवारी रोजी बारापुल्ला उड्डाणपुलाजवळ एका तृतियपंथियाची गोळ्या घालून हत्या केल्याच्या आरोपात पोलिसांनी २१ जानेवारीला सुंदर भाटी टोळीचा सदस्य सागर उर्फ लम्पक याला अटक केली होती. हत्येसाठी वापरलेले शस्त्र आपण कासिफकडून विकत घेतल्याची कबुली लम्पक याने पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मेरठ येथे छापा घातला. पण त्यांना कासिफ आढळला नाही. तो शस्त्र पुरवण्यासाठी निझामुद्दीन बस स्थानकावर गेल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सकाळी १०.१५ वाजता कासिफला अटक केली.कासिफ हा २५ हजारात पिस्तुल विकत घेऊन नंतर ते ३० ते ४० हजारात विकत असल्याची माहिती आहे. त्याच्या ताब्यातून एक पिस्तुल व १८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.शस्त्रे आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा‘सोशल मीडिया’वरील त्याचे विचार पाहून त्यांचा पाकिस्तानी साथीदार अबू मौज याने लतीफ याच्याशी संपर्क साधला. नंतर तो त्याला चिथावणी देण्यासाठी अजहर मसूद या अतिरेक्याचे व्हिडिओ आणि आॅडियो क्लीप पाठवित असत. तो जाळ्यात आल्यानंतर लतीफ याला हल्ल्याची योजना देऊ लागला. पाकिस्तानातून अबू मौज याने दिल्लीवर हल्ला करण्यासाठी लतीफ यास तयार केले. शस्त्रे आणि आवश्यक वस्तूही दिल्या.अब्दुल लतीफ आणि हिलाल अहमद गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये एका कार्यशाळेसाठी जम्मू-काश्मीरवरुन दिल्लीस आले. यावेळी अतिमहत्त्वाच्या परिसराची व अन्य विभागांची रेकी केली. सुरक्षा यंत्रणेच्या नजरेत येऊ नये यासाठी ते सोशल मीडिया आणि मोबाईल चॅटच्या माध्यमातून संपर्कात राहत.
दिल्लीत धार्मिक तणाव निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 6:02 AM