सुप्रीम कोर्टाचा अवमान; ३ वकिलांना तुरुंगवास; न्यायाधीशांवर बेछूट आरोप करणे भोवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 11:56 PM2020-05-06T23:56:10+5:302020-05-06T23:56:21+5:30
प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला
नवी दिल्ली : राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांकडे केलेल्या तक्रारीत न्या. रोहिंग्टन नरिमन आणि न्या. विनीत शरण या दोन न्यायाधीशांविरुद्ध बेछूट आणि निंदनीय आरोप करून न्यायालयाचा अवमान (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) केल्याबद्दल विजय कुर्ले, निलेश ओझा आाणि रशीद खान पठाण या मुंबईतील तीन वकिलांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रत्येकी तीन महिन्यांची साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
बॉम्बे बार असोसिएशन’ या वकिलांच्या व ‘ बॉम्बे इन्कॉर्पोरेटेड लॉ सोसायटी’ या सॉलिसिटर फर्मच्या संघटनांनी पाठविलेल्या पत्रावरून सर्वोच्च न्यायालयाने या तिघांविरुद्ध गेल्या वर्षी स्वत:हून ‘कन्टेम्प्ट’ची कारवाई सुरू केली होती. त्यात २७ एप्रिल रोजी तिघांनाही दोषी ठरवून शिक्षेसाठी बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, तिघांनीही शिक्षेविषयी युक्तिवाद करण्याऐवजी २७ एप्रिलचा निकाल मागे घेण्यासाठी, एका न्यायाधीशाने सुनावणीतून माघार घेण्यासाठी व एकूणच सुनावणी तहकूब करण्यासाठी अर्ज केले. न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने आरोपींचे वरील सर्व अर्ज फेटाळले व त्यांना जराही पश्चात्ताप झाल्याचे दिसत नाही, असे नमूद करीत वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. मात्र, सध्या ‘लॉकडाऊन’ सुरू असल्यामुळे आरोपींनी ही शिक्षा १६ आठवड्यांनंतर भोगावी, असा आदेश दिला गेला. शिक्षा भोगण्यासाठी त्यांनी न्यायालयाच्या महाव्यवस्थापकांपुढे स्वत:हून हजर व्हायचे आहे; अन्यथा त्यांच्याविरुद्ध अटक वॉरन्ट काढले जाईल. दंड न भरल्यास तिघांनाही १५ दिवस तुरुंगात राहावे लागेल.
न्यायमूर्तींना ‘व्हिडिओ’ निरोप : हा निकाल दिल्यानंतर काही तासांतच न्या. दीपक गुप्ता सेवानिवृत्त झाले. ते फेब्रुवारी २०१७ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. न्यायालयापुढील प्रांगणाच्या हिरवळीवर निवृत्त होणाऱ्या न्यायमूर्तींसाठी वकील संघटनेतर्फे हृद्य निरोप समारंभ आयोजित केला जातो; परंतु सध्या कोरोनामुळे न्यायालयाचे काम जसे व्हिडिओ माध्यमाने सुरू आहे, तसा न्या. गुप्ता यांचा व्हिडिओ निरोप समारंभ झाला. सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले गेले.