बक्सर (बिहार) : गंगा नदीत मृतदेह आढळल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पाटणा उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दोन अहवालातील विरोधाभासावर प्रश्न उपस्थित करून पाटणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १९ मेपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.
बिहारच्या मुख्य सचिवांच्या अहवालात कोरोनामुळे झालेले मृत्यू आणि पाटणा विभागीय आयुक्तांनी नमूद केलेली बक्सर स्मनशनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या यात ताळमेळ लागत नाही. अधिकृत वेबसाईटवर मृत्यू आणि जन्मनोंदणीसंबंधी माहिती अद्ययावत नसल्यावरूनही राज्य सरकारला फटकारले. खंडपीठाने सोमवारी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना उपरोक्त निर्देश दिले.
आकडे बोलतातमुख्य सचिवांच्या अहवालात १ मार्च ते १३ मेपर्यंत कोरोनामुळे बक्सरमध्ये फक्त सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे, तर विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार ५ ते १४ मेपर्यंत बक्सर येथील स्मशानभूमीत ७८९ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोर्टाने सरकारला बक्सर जिल्ह्यात कोरोनाने विविध गटातील किती लोकांचा मृत्यू झाला, याबाबत स्पष्टीकरणांसह गुरुवारी पुन्हा उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.