नवी दिल्ली- भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरू झालेल्या ताजमहालचा वाद थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. प्रेमाचं प्रतीक समजल्या जाणा-या ताजमहालवर हरियाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनी तोंडसुख घेतलं आहे. ताजमहाल एक सुंदर दफनभूमी आहे. ताजमहालची प्रतिकृती घरात ठेवण्यासही लोक अपशकुन समजतात. इमारत फार सुंदर आहे, परंतु त्यात कबरीच तर आहेत, असं अनिल वीज म्हणाले आहेत.
ताजमहालबद्दल काय म्हणाले संगीत सोम उत्तर प्रदेशात एक अशी निशाणी आहे, जिला नाही म्हटलं पाहिजे. ताजमहालला ऐतिहासिक स्थळांच्या यादीत स्थान दिलं नाही म्हणून अनेकांना दु:ख झालं. कसला इतिहास, कुठला इतिहास, कुणाचा इतिहास ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने आपल्या बापाला कैद केलं होतं ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं ? अशा लोकांचं नाव जर आजही इतिहासात असेल, तर हे खूपच दुर्भाग्यपुर्ण आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो की इतिहास बदलला जाईल'.
योगी आदित्यनाथ सरकारने या अर्थसंकल्पात ताजमहालला सांस्कृतिक वारसा स्थळांच्यायादीत समाविष्ट केले नव्हते. त्यांनी ताजमहालला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानण्यास नकार दिला होता. ताजमहल हा एका इमारतीशिवाय काहीही नाही, असे ते म्हणाले होते. भारताचे पंतप्रधान परदेशी जाताना तेथील राष्ट्रप्रमुखांना आपल्या सांस्कृतीचे प्रतिनिधित्व करणा-या वस्तू घेऊन जात. त्यात ताजमहालची प्रतिकृती असे, तसेच परदेशी पाहुण्यांनाही भारतात आल्यावर ती दिली जात असे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा परदेशात गेले, तेव्हा त्यांनी संबंधित देशांच्या प्रमुखांना भगवद्गीता व रामायणच्या प्रती भेट म्हणून दिल्या होत्या, याचा उल्लेख आदित्यनाथ यांनी बिहारमधील एका मेळाव्यात केला होता.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीदेखील ताजमहालवरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'भारतीय संस्कृती आणि वारसा संपवण्यासाठी भाजपाने आखलेला हा राजकीय अजेंडा आहे'. ममता बॅनर्जी यांनी भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. 'मुगलसराय स्थानकाचं नाव बदलून पंडित दिन दयाल उपाध्याय स्थानक करणा-या भाजपाने ताजमहालला का सोडलं ? त्याचं नाव का बदललं नाही ?' असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला.