नवी दिल्लीः गृह मंत्रालयाचे माजी सचिव आर. वी. एस मणी यांनी मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मुंबईवरच्या ताज हॉटेलवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान आणि तत्कालीन यूपीए सरकारच्या संगनमतानं झाल्याचा गंभीर आरोप मणी यांनी केला आहे. कारण त्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयातील जास्त करून अधिकारी दहशतवादावर होणाऱ्या वार्षिक गृह सचिवस्तरावरच्या चर्चेसाठी इस्लामाबादला होते. ही चर्चा 25/11/2008ला पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु तिथे गेल्यानंतर ती तारीख वाढवून 26/11 करण्यात आली. त्यावेळी मला लखनऊला पाठवण्यात आलं होतं. त्याचदरम्यान मध्यरात्री हा हल्ला झाला.ते म्हणाले, हिंदू दहशतवाद ही एक जाणूनबुजून निर्माण करण्यात आलेली संकल्पना आहे. ही संकल्पना त्यावेळच्या केंद्र सरकारमधील काही मोठे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून पसरवली होती. त्यानंतर त्याचे पुरावे शोधण्यात आले. केंद्र सरकारचा काय उद्देश होता ते माहीत नाही. पण त्यामुळे खरे दहशतवादी पळून गेले. मणी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीनं पुस्तक 'हिंदू टेरर- इनसायडर अकाउंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर'च्या प्रकाशनादरम्यान हे विधान केलं आहे. त्यांच्या पुस्तकातील भगवा दहशतवाद एक षडयंत्र यावर एक चर्चासत्र झालं. चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले की, मी काही राजकीय व्यक्ती नाही आणि पुस्तक प्रकाशनासाठी भोपाळला आलो आहे. याच दरम्यान 'द ग्रेट इंडियन कांस्पिरेसी' आणि 'आतंक से समझौता'चे लेखक आणि पत्रकार प्रवीण तिवारी यांनीही काँग्रेस नेत्यांवर हिंदू दहशतवाद संकल्पना रुजवण्याचा आरोप केला होता. मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या गळ्यात हिंदू धर्माचे लॉकेट घालण्यात आले होते, याची वाच्यता अमेरिकेनं पकडलेला दहशतवादी डेव्हिड हेडलीनं केली होती. जर कसाबला जिवंत पकडलं नसतं, तर सर्व दहशतवादी हिंदू घोषित करण्यात आले असते, हे एक षडयंत्र होतं, ते यशस्वी झालं नाही, असा आरोपही प्रवीण तिवारी यांनी केला आहे.
"26/11 हल्ला पाक अन् यूपीए सरकारच्या संगनमतानंच, हिंदू दहशतवादी संकल्पना काँग्रेसचीच"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 11:33 AM