नवी दिल्ली - संपूर्ण जग कोरोनाने वेठीस धरले आहे. आता आपल्या देशातही कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात आतापर्यंत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाला पराभूत करण्यसाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून विविध प्रकारची पावले उचलली जात आहेत. मात्र असे असतानाच समाजवादी पक्षाच्या एका माजी खासदाराचे बेताल वक्तव्य समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील आजमगडचे माजी खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते रमाकांत यादव यांनी म्हटले आहे की, कोरोना म्हणजे एक प्रकारचा छळ आहे. एनआरसी, सीएए आणि महागाईच्या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठी कोरोनाचा बाऊ केला जात आहे. जगात कोरोना असू शकतो, मात्र भारतात नाही. एवढेच नाही, तर आपण कोरोना संक्रमित व्यक्तीला छातीशी लावायलाही तयार आहोत, असेही यादव यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ‘‘जनता कर्फ्यू ’’चे आवाहन केले आहे. यावेळी आवश्यक सेवांशी संबंधित व्यक्तींशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे मोदींनी म्हटले आहे.
बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या पार्टीत उपस्थित असणाऱ्या राजकीय नेत्यांसह अनेक मान्यवरांची तपासणी केली जाणार आहे. लंडनहून परतल्यानंतर कनिकाने लखनौ येथे पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीत भाजपा खासदार दुष्यंतसिंह हजर होते. त्यामुळे संसदेतही कोरोनाचा शिरकाव झाल्याची चर्चा सुरु आहे.
याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा फैलाव वाढू न देण्यासाठी संसदेचे अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे. सुमारे १५० खासदार दुष्यंतसिंह यांच्या संपर्कात आले होते. राष्ट्रपती भवनातील चहापानाला दुष्यंतसिंह व राजस्थानचे अनेक खासदारही हजर होते. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, खासदार अनुप्रिया पटेल, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यादेखील चहापानाला उपस्थित होत्या. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अन्य नेत्यांनाही कोरोनाचा धोका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रपतीही कोरोनाची तपासणी करुन घेणार आहेत.
कोरोना व्हायरसने जगभरात रौद्र रुप धारण केले असून १७९ देशांना विळखा घातला आहे. आतापर्यंत 10049 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अडीज लाखांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, इटलीमध्ये कोरोना विषाणूने आता चीनपेक्षा भयानक रूप धारण केले आहे. कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वीच इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज इटलीमध्ये दिवसभरात 627 जणांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीमध्ये सुमारे चार हजार जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.