नवी दिल्ली : ल्यूटन्स झोनमधील सरकारी कार्यालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट आहे. आधी निती आयोग तर आता रेल्वे भवनात कोरोना रुग्ण आढळले. रेल्वे भवनाच्या प्रवेशद्वारावर तैनात अधिकारी महिलेस कोरोनाची लागण झाली. रेल्वे भवनात तीन जणांना कोरोना झाला आहे.
लाकडाऊन सुरू झाल्यानंतरही कमी मनुष्यबळावर सरकारी कार्यालयांमध्ये काम सुरू होते. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, पोलिसांपाठोपाठ आता सरकारी कर्मचाºयांना धोका वाढला आहे. कोरोेना रुग्ण आढळला तरी संपूर्ण इमारत सील करण्याची गरज नसल्याची मार्गदर्शिका आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे रुग्ण आढळल्यावर दुसºया दिवशी जीव मुठीत धरून कर्मचारी कार्यालयात येतात.
निती आयोगाच्या कर्मचाºयास एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली. संसदेपासून जवळच असलेल्या बंगाली मार्केटमध्येही कोरोना रुग्ण आढळले होते. तेव्हापासून या भागात भीतीचे वातावरण आहे. केंद्रीय मंत्री, खासदार, अधिकारी, न्यायमूर्ती, लष्करातील अधिकाºयांचे बंगले या भागात आहेत. बंगल्यांची स्वच्छता, उपकरणांची दुरुस्ती, पाणी-वीज कनेक्शन, एसीची दुरुस्ती याची जबाबदारी सीपीडब्ल्यूडीकडे असते.
दिल्लीत मुक्काम असलेल्या खासदारांनी एसीची दुरुस्तीदेखील यंदा करवून घेतली नाही. ल्यूटन्स झोनमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने दहशतीचे वातावरण आहे. रेल्वे भवनातील कर्मचारी महिलेस कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या निवासस्थानचा परिसर स्वच्छ करण्यात आला. रुग्ण महिलेस अत्यंत सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे तिला घरातच क्वारंटाइनचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
दिल्लीत बस सुरू झाली. लवकरच मेट्रोही धावू लागेल.अशा वेळी ल्यूटन्स दिल्लीतील महत्त्वाची केंद्रीय सचिवालय, पटेलनगर, उद्योग भवन या मेट्रो स्थानकावर उतरणाºया बहुतांश सरकारी कर्मचाºयांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागेल.