देशात नवीन 6 हजार 987 रुग्णांची नोंद तर 162 मृत्यू, ओमायक्रॉन रुग्णसंख्या 422 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 11:07 AM2021-12-26T11:07:38+5:302021-12-26T11:12:42+5:30
ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी दहा राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली आहेत.
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा फार कमी झाली आहे. पण, आजही काही हजारांमध्ये रुग्ण सापडत आहेत. यातच कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने भीती आणखी वाढवली आहे. पण, शनिवारच्या तुलनेत रविवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये किंचित घट झाली आहे.
कोरोना रुग्णसंख्या एक लाखांपेक्षा कमी
आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज कोरोनाचे 6 हजार 987 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 162 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 76 हजार 766 झाली आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या 3 कोटी 42 लाख 30 हजार 354 झाली आहे. तर, 4 लाख 79 हजार 682 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत सरकारकडून 141 कोटी 30 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील काहींना दोन्ही तर काहींना लसीचा एक डोस मिळाला आहे.
India reports 6,987 new #COVID19 cases, 7,091 recoveries, and 162 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) December 26, 2021
Active cases: 76,766
Total recoveries: 3,42,30,354
Death toll: 4,79,682
Total number of #Omicron cases 422
Total Vaccination: 141.37 cr pic.twitter.com/fpbfcTI9dg
15-18 वयोगटातील मुलांना लस दिली जाणार
ओमायक्रॉनचा वाढता धोका आणि कोविड-19 ची तिसरी लाट येण्याची भीती असताना, पंतप्रधान मोदींनी शनिवारी घोषणा केली की पुढील वर्षी 3 जानेवारीपासून 15-18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरू केला जाईल. यासोबतच त्यांनी 10 जानेवारीपासून डॉक्टर, आरोग्य आणि आघाडीचे कर्मचारी यांना आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे.
केंद्राने दहा राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली
ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दहा राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, ज्या 10 राज्यांमध्ये ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे आढळत आहेत आणि ज्याठिकाणी कोरोना लसीकरण कमी झाले आहे, त्याठिकाणी केंद्रीय पथके तैनात केली जात आहेत.
या राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब यांचा समावेश आहे. ही पथके राज्यांमध्ये तीन ते पाच दिवस तैनात राहतील आणि राज्याच्या आरोग्य अधिकार्यांशी जवळून काम करून परिस्थितीचे आकलन करतील आणि उपाययोजना सुचवतील. तसेच, सार्वजनिक आरोग्य उपक्रमांचा अहवाल दररोज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारला देतील.