लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २० हजारांपर्यंत पोहोचली असून, या आजाराला बळी पडलेल्यांची संख्या सहा हजारांपेक्षा अधिक झाली आहे.आतापर्यंत देशामध्ये दरदिवशी कोरोनाचे चार किंवा पाच हजार नवे रुग्ण आढळत होते. गेल्या १५ दिवसांत त्यात अधिक वाढ होत गेली आणि गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे ९ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले.
देशात बुधवारी कोरोनामुळे २६० हून अधिक लोकांचा बळी गेला. एकट्या महाराष्ट्रामध्ये १२२ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण बळींपैकी ४८ टक्के लोक महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीमध्ये बुधवारी ५०, तर गुजरातमध्ये तीस जणांचा या साथीने बळी गेला. कोरोना रुग्णांपैकी १ लाखांहून अधिक लोक उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ७५ हजारांच्या पुढे गेली आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत बुधवारी आणखी १,५२३ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे तेथील कोरोना रुग्णांची संख्या २३ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. दिल्लीत ६०० पेक्षा जास्त लोक बळी पडले आहेत.
दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या, त्यांची स्थिती व रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या आदी तपशील जाणून घेण्यासाठी दिल्ली कोरोना हे अॅप विकसित केले आहे. तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी २५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. महाराष्ट्रानंतर कोरोना रुग्णांचा २५ हजारांचा टप्पा करणारे तामिळनाडू हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. गुजरातमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार झाला आहे.रेमडिसिव्हिरबद्दलच्या निर्णयाचे स्वागतप्रकृती चिंताजनक असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडिसिव्हिर या औषधाचा वापर करण्यास भारताने परवानगी दिली आहे. गिलिड सायन्सेस या कंपनीतर्फे हे औषध बनविण्यात येते. कोरोना रुग्णांवर केलेल्या चाचण्यांत रेमडिसिव्हिर औषधामुळे रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे निदर्शनास आले होते. रेमडिसिव्हिरचा समावेश केल्याने भारतात कोरोना प्रतिबंधक उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.77,793राज्यात कोरोना रुग्णमुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात २ हजार ९३३ जणांना कोरोनाची बाधा झाली, तर दिवसभरात १२३ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७७ हजार ७९३ झाली असून, बळींचा आकडा २ हजार ७१० झाला आहे. दिवसभरात १ हजार ३५२ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.२९ टक्के झाले असून, मृत्यूदर ३.४८ टक्के एवढा आहे.रशिया, भारतात वाढत आहेत रुग्णकोरोनाचे सर्वाधिक म्हणजे १९ लाखांहून अधिक रुग्ण अमेरिकेत असले तरी रशिया, भारत व इराणमध्ये आता रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जगात ६६ लाखांहून अधिक रुग्ण असले तरी त्यातील ३२ लाख बरे झाले आहेत आणि ३५ लाख ८५ हजार जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आतापर्यंत ३ लाख ८९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १ लाख ९ हजार एकट्या अमेरिकेतील आहेत.