कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं?, तिसऱ्या लाटेबाबत AIIMS चे डॉ. गुलेरिया म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 07:56 AM2021-11-24T07:56:27+5:302021-11-24T08:01:35+5:30
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स, दिल्लीचे व्यवस्थापक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भाष्य केलं आहे.
मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सर्वकाही सुरळीत सुरू आहे. मात्र, चीन आणि युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे, अनेक देशात लॉकडाऊन लावण्यात येत असून निर्बंधही कडक करण्यात येत आहेत. त्या, पार्श्वभूमीवर भारतातही कोरोनाची तिसरी लाट येणार का?, तिसऱ्या लाटेचा प्रभाव कितपत तीव्र असेल? या प्रश्नांवर चर्चा होत आहे. मात्र, देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने तिसरी लाट आल्यास ती अधिक तीव्र नसेल, असे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स, दिल्लीचे व्यवस्थापक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भाष्य केलं आहे. देशात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेची तीव्रता तेवढी अधिक नसेल, असे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत नसल्याने कोरोना लसीचा प्रभाव होत असल्याचे दिसून येते. कोरोना लसीमुळे सुरक्षा कवच मिळाले असून नागरिकांना तिसऱ्या बुस्टर डोसची गरज नाही, असेही गुलेरिया यांनी सांगितले.
बुस्टर डोसबाबत बैठकीनंतरच निर्णय
राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची (National Technical Advisory Group) या महिन्याच्या अखेरीस कोरोना विरोधी लसीचा बुस्टर डोस देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तर या बैठकीत बुस्टर डोसबाबत महत्त्वाची चर्चा केली जाऊ शकते. बुस्टर डोससोबतच लहान मुलांना लस देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा केली जाऊ शकते. दरम्यान, या दोन्ही मुद्द्यांवर आतापर्यंत विविध चर्चा केल्या जात असल्या तरी ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे. एका उच्चस्तरिय बैठकीत बुस्टर डोस दिली जाणाऱ्याबाबत चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
युरोपात ७ लाख मृत्यूची इशारा
युरोपमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. व्यापक लसीकरणानंतरही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनाही धक्का बसला आहे. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण याच वेगाने वाढत राहिले तर पुढच्या काही महिन्यांमध्ये युरोपमध्ये ७ लाख कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
युरोपात बुस्टर डोसला प्राधान्य
जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपमधील कार्यालयाने सांगितले की, पूर्वानुमानानुसार युरोपमधील ५३ देशांमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे सात लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या २० लाखांवर पोहोचेल. जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपमधील कार्यालय डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपनहेगनमध्ये आहे. संघटनेने संसर्गापासून संरक्षणासाठीच्या उपायांमध्ये राहत असलेली कमतरता आणि लसीकरणामुळे सौम्य आजार समोर येत असल्याचा हवाला दिला आहे. तसेच कमकुवत इम्युनिटी असलेल्या ६० वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांना तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसह सर्वाधिक संवेदनशील लोकसंख्येला कोरोनाच्या लसीचा बुस्टर डोस देण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले.