नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे यासाठी केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ वर्षावरील सगळ्यांना मोफत लस देण्याचं जाहीर केले आहे. लसीकरण मोहिमेला वेग यावा यासाठी प्रत्येक सरकार प्रयत्नशील आहे. सरकारी लसीकरण केंद्रासोबतचं खासगी हॉस्पिटलही, राजकीय नेते आणि संस्थांही कॅम्प लावत आहेत. जेणेकरून लोकांना त्यांच्या घराजवळ लस उपलब्ध होऊ शकेल.
परंतु आपण ज्या केंद्रावर लसीकरण करत आहात ते खरं आहे की बनावट याची चिंता तुम्हालाही लागली असेल. पहिल्यांदा मुंबईत बनावट लसीकरण कॅम्पचं प्रकरण समोर आलं. आता तृणमूल काँग्रेस खासदार मिमी चक्रवर्ती यांनी कोलकाता येथील एका बनावट लसीकरण कॅम्पची तक्रार केली आहे. त्यामुळे तुम्ही ज्या कॅम्पमध्ये लसीकरण करण्यासाठी जात आहात ते बनावट तर नाही ना याची खातरजमा कशी कराल?
लसीकरण केंद्र उघडण्यासाठी काय काय आवश्यक आहे? हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, जर कोणीही लसीकरण शिबीर सुरू करत असेल तर ते स्थानिक प्राधिकरण अथवा खासगी हॉस्पिटल यांच्याशी संयुक्त विद्यमानाने चालवू शकतो. लस कोणालाही सहज उपलब्ध होत नाही.
काय आहे व्यवस्था?
केंद्र सरकार लस खरेदी करून राज्यांना उपलब्ध करून देत आहे. खासगी हॉस्पिटल थेट उत्पादन कंपन्यांकडून लस खरेदी करत आहेत. जर कोणतीही संस्था खासगी हॉस्पिटलसोबत मिळून लसीकरण शिबीर सुरू करत असेल तर त्याठिकाणी लस खासगी हॉस्पिटल उपलब्ध करून देईल आणि लस देण्यासाठी त्या हॉस्पिटलचे कर्मचारी आणि डॉक्टर्सही येतील.
त्याचप्रमाणे राज्य सरकारसोबत मिळून कॅम्प लावण्यापूर्वी आरोग्य विभाग ज्याठिकाणी कॅम्प लागणार आहे तेथे पर्याप्त जागा आहे का? लस ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था आहे का? याची खातरजमा करून घेते. दिल्ली प्रेस क्लबमध्ये दिल्ली सरकार आणि खासगी हॉस्पिटलच्या सहाय्याने कॅम्प लावला होता. यासाठी सर्व परवानगी आणि कागदपत्रे तपासून घेतले जातात.
कशी घ्याल काळजी?
टास्क फोर्सचे अधिकारी म्हणाले की, जर कोणत्या शिबिरात तुम्ही लसीकरण करण्यासाठी जात असाल तर ते सरकारकडून आहे की खासगी हॉस्पिटलकडून त्याची माहिती करून घ्या. हॉस्पिटलकडून असेल तर संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधून कॅम्पबद्दल खातरजमा करा. आरोग्य खात्याकडून याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करायला हवी असं तज्ज्ञ सांगतात. त्याचसोबत ज्याठिकाणी लसीकरण शिबीर लागेल तिथे मोठ्या बोर्डावर सर्व परवाने, कागदपत्रे ठळक बोर्डावर चिटकवायला हवीत. त्यासोबत स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही शेअर करायला हवा कारण यामुळे लोकांना संशय आल्यास ते याबाबत चौकशी करू शकतील असं आरोग्यतज्त्र डॉ. कौशल मिश्रा म्हणाले. तसेच जिथे कॅम्प लागणार आहे तेथील स्थानिक पोलिसांनी सर्व परवानग्या घेतल्या आहेत की नाही याचा तपास करावा. लसीकरण जितकं महत्त्वाचं आहे तितकचं बनावट लसीकरणापासून लोकांचे संरक्षण करणेही गरजेचे आहे.
मुंबईत आतापर्यंत बोगस लसीकरणाबाबत ५ गुन्हे दाखल
बोगस लसीकरणप्रकरणी पाचवी एफआयआर गुरुवारी बांगुरनगर पोलिसांनी दाखल केली. पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये हे लसीकरण करण्यात आले. ज्यात २०७ लोकांचा समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार याप्रकरणी चौकशी सुरू आहे. पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ज्या २०७ जणांना लस टोचण्यात आली त्यात सरकारी बँक तसेच खासगी अस्थापनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बोरिवलीच्या आदित्य कॉलेजमधील २१३ जणांच्या बोगस लसीकरण प्रकरणी बुधवारी बोरिवली पोलिसांनी चौथा दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. ज्यात कोकिलाबेहेन रुग्णालयाचा माजी कर्मचारी राजेश पांडे, शिबिर आयोजक संजय गुप्ता आणि मास्टरमाइंड महेंद्र सिंग याच्यासह अजुन पाच जणांची नावे आहेत. या टोळक्याने अद्याप ९ ठिकाणी असे बनावट लसीकरण शिबिर आयोजित केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे असुन त्यात आदित्य कॉलेजसह चित्रपट प्रोडक्शन हाऊस, हिरानंदानी हेरिटेज सोसायटी यांचा समावेश आहे.