नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तर, दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा देशभरात सुरू झाला असून, ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी केली जात असताना केंद्र सरकारकडून याबाबतीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (coronavirus update now vaccination to be done on all days)
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात वेग वाढावा, यासाठी एप्रिल महिन्यातील सर्व दिवशी लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत. सार्वजनिक सुट्टींच्या दिवशीही कोरोना लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.
सुट्टीच्या दिवशीही लस दिली जाणार
एप्रिल महिन्याच्या कालावधीत कोरोना लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत. सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर सुट्टीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
“व्याजदर कपातीबाबत सकाळी पेपर वाचल्यावर निर्मला सीतारामन यांना समजले असावे”
कोरोना संक्रमणाचा वेग चढाच
महाराष्ट्रासह काही राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्राने काही निर्णयही घेतले आहेत. त्यात कोरोना लसीकरणाला वेग देण्यावर जोर देण्यात आला आहे. कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या जिल्ह्यांत दोन आठवड्यात कोरोना लसीकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७२,३३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,२२,२१,६६५ वर पोहोचली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १,६२,९२७ पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ५,८४,०५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १,१४,७४,६८३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.