नवी दिल्ली : कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात उत्तम प्रतिकार शक्ती निर्माण होते असे एका पाहणीतून आढळून आले आहे. देशातील १३ राज्यांतल्या २१ शहरांत जानेवारी ते मे महिन्यादरम्यान कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्यसेवकांपैकी ५१५ जणांच्या आरोग्याची या पाहणीसाठी तपासणी करण्यात आली. त्यातील ४२५ जणांनी कोविशिल्ड व ९० जणांनी कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले होते. अहवालात म्हटले आहे की, ५१५ आरोग्यसेवकांमध्ये ३०५ पुरुष व २१० महिला होत्या. कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर या व्यक्तींमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांमध्ये अनुक्रमे ९८.१ टक्के व ८० टक्के सिरो पॉझिटिव्हिटी निर्माण झाली.
मुलांच्या आरोग्याची घेणार काळजीआता २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्या देशात सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन भारताने ही पूर्वतयारी केली आहे. देशात कोरोना लसींचा तुटवडा लक्षात घेऊन विदेशातून लसी आयात करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या. फायझर व मॉडेर्नाच्या कोरोना लसी काही काळानंतर भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या या कंपन्यांबरोबर केंद्र सरकारची चर्चा सुरू आहे.