कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत काय म्हणाले सरकार? जाणून घ्या, सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 01:57 PM2021-09-17T13:57:09+5:302021-09-17T13:57:51+5:30
corona vaccine booster dose : जगातील अनेक विकसित देशांनी कोरोनाविरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न समोर येत आहे की, भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस कधी दिला जाईल? यावर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोना व्हायरसचा कहर सातत्याने वाढत आहे. या साथीच्या आजाराविरुद्ध लस सर्वात मोठे शस्त्र मानले जात आहे. भारतात सध्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे. तर जगातील अनेक विकसित देशांनी कोरोनाविरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न समोर येत आहे की, भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस कधी दिला जाईल? यावर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे आणि म्हटले आहे की, सध्या प्राधान्य दोन डोसचे पूर्ण लसीकरण आहे.
बूस्टर डोस वैज्ञानिक चर्चेत मुख्य नाही - आरोग्य मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) हे स्पष्ट केले आहे की, भारताची प्राधान्यता सर्व लोकांना कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस देणे आहे आणि हे चालूच राहणार आहे. वर्षाच्या अखेरीस प्रत्येकाला लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. बूस्टर डोस (Covid-19 Vaccine Booster Dose) यावेळी वैज्ञानिक चर्चेत मुख्य विषय नाही.
दोन्ही डोसचे पूर्ण लसीकरण आवश्यक - आयसीएमआर
अनेक एजन्सींनी शिफारस केली आहे की, अँटीबॉडीची पातळी मोजली जाऊ नये. परंतु हे समजून घेणे महत्वाचे की दोन्ही डोसचे संपूर्ण लसीकरण आहे आणि कोणतीही शिथिलता नसावी, असे कोविड -19 वर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ब्रीफिंग दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डीजी डॉ. बलराम भार्गव (ICMR DG Balram Bhargava)म्हणाले. तसेच, सरकारच्या वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य सेवा चर्चेत यावेळी बूस्टर डोस हा मुख्य विषय नाही. दोन डोससह पूर्णपणे लसीकरण हे मुख्य प्राधान्य आहे, असे डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.
पाच रुग्णांवर जून ते ऑगस्ट दरम्यान सर गंगा राम रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. #coronavirus#Gangrenehttps://t.co/prpnwIM5Xu
— Lokmat (@MiLOKMAT) September 17, 2021
99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस
भारतातील 20 टक्के वयस्कर लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि 62 टक्के लोकांना किमान एक डोस मिळाला आहे. 99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे आणि 82 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 100 टक्के आघाडीच्या कामगारांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर 78 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.
देशभरात 77.25 कोटी लोकांनी घेतले डोस
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोना लसीचे 77 कोटी 24 लाख 25 हजार 744 डोस देण्यात आले आहेत. देशभरात 58 कोटी 26 लाख 6 हजार 905 लोकांनी किमान एक डोस घेतला आहे, तर 18 कोटी 98 लाख 18 हजार 839 लोकांना दोन्ही डोस दिले आहेत.